गोपालकृष्ण मांडवकर । लोकमत न्यूज नेटवर्कखुडूस (जि. सोलापूर) : माऊलींच्या पहिल्या गोल रिंगण सोहळ्याची ऊर्मी ताजी असतानाच शुक्रवारी सकाळी ९ वाजता खुडूस फाटा येथे दुसरा गोल रिंगण सोहळा पार पडला. सूर्यनारायणाच्या कोवळ्या उन्हात माऊलींच्या अश्वांनी बेफाम दौड करून पाच रिंगण पूर्ण केले. ‘हरी विठ्ठल...’ ‘माऊली... माऊली...’च्या गजराने यावेळी आसमंत निनादून गेला होता.माळशिरसवरून सकाळी ६ वाजता माऊलींची पालखी मार्गस्थ झाली. आषाढ शुद्ध सप्तमी हा माऊलींच्या दुसऱ्या गोल रिंगणाचा दिवस असतो. माळशिरस ते खुडूस फाटा हे साडेचार किलोमीटरचे अंतर पूर्ण करून सोहळा खुडूस फाट्याच्या मैदानावर पोहोचला, तेव्हा दिंड्या आणि भाविकांनी आधीच मैदान फुलून गेले होते. गोल रिंगणाच्या आखणीनुसार मानाच्या दिंड्यांनंतर पालखीने रिंगणाला प्रदक्षिणा घालून आत प्रवेश केला. रिंगणातील स्थळावर माऊली विराजमान झाल्यावर अश्व सज्ज झाले. तत्पूर्वी रिंगणाच्या मार्गावर सुशोभित रांगोळ्याही घालून झाल्या होत्या. अगदी साडेनऊ वाजता रिंगण सोहळा सुरू झाला. प1्रारंभी स्वाराने हाती भगवा ध्वज उंच धरून रिंगण घातले. त्यानंतर माऊलींच्या अश्वाने एकापाठोपाठ पाच रिंगण पूर्ण केले. टाळ-मृदंगाच्या लयीत विठुनामाचा गजरात हा रिंगण सोहळा पूर्ण झाला. खुडूसमधील माऊली पालखीच्या रिंगण सोहळ्याला लक्षावधी भाविक उपस्थित होते.
कोवळ्या उन्हात रंगला रिंगण सोहळा!
By admin | Published: July 01, 2017 2:42 AM