ऑनलाइन लोकमतअमरावती, दि. 07 - विविध योजनांचे आमिष दाखवून गुतंवणूकदारांची फसवणूक करणाऱ्या भाईचंद हिराचंद रायसोनी समूहाच्या (बीएचआर) १३ पदाधिकाऱ्यांना राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने शुक्रवारी अटक केली. न्यायालयाने १३ आरोपींना १० आॅक्टोबरपर्यंतची पोलीस कोठडी सुनावली आहे. बीएचआरच्या राजापेठस्थित शाखेने गुतवंणूकदारांची तब्बल १० कोटी ५२ लाख रुपयांनी फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. संचालक प्रमोद भाईचंद रायसोनी, दिलीप कांतीलाल चोरडीया, मोतीलाल ओंकार गिरी, सूरजमल जैन, हितेंद्र महाजन, भागवत माळी, राजाराम कोळी, दादा पाटील, भगवान वाघ, इंद्रकुमार लालवाणी, शेख रहमान शेख अब्दूल नबी, सुखलाल माळी व यशंवत गिरी अशी आरोपींची नावे आहेत. बीएचआरच्या भारतभरात २५० शाखा असून अमरावती जिल्ह्यात अंजनगाव, खोलापुरी गेट व राजापेठ या तीन ठिकाणी शाखा होत्या. या तीनही शाखांच्या माध्यमातून बीएचआरच्या पदाधिकाऱ्यांनी गुतवंणूकदारांकडून कोट्यवधींची रक्कम गोळा करून पोबारा केला. याबाबत ३० मार्च २०१५ रोजी राजापेठ पोलीस ठाण्यात राधेश्याम चांडक यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध भादंविच्या कलम ४०९, ४२०, ४६८, १२० (ब), एमपीआयडीनुसार गुन्हा नोंदविला होता. यामध्ये चांडक यांची २ लाखांनी फसवणूक केल्याची तक्रार करण्यात आली. त्याचप्रमाणे आरोपींनी गुतवणुकदारांची १० कोटी ५२ लाखांची फसवणूक केल्याचे उघड झाले होते. राजापेठ पोलिसांच्या चौकशीनंतर हा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला होता. त्यानंतर डिसेंबर २०१५ मध्ये हा तपास राज्य अन्वेषण विभागाकडे सोपविण्यात आला आहे. पोलीस आरोपींचा शोध घेत होते. दरम्यान जळगाव पोलिसांनी बीएचआरच्या संचालकासह १३ पदाधिकाऱ्यांना अटक केली. या आरोपींना सीआयडीने प्रोड्यूस वाँरटवर ताब्यात घेतले असून शुक्रवारी अमरावतीत आणले. पोलीस उपअधीक्षक एस.डी.सोळंके यांच्या नेतृत्वात हेड कॉन्स्टेबल गजानन पवार, नितीन पेठे यांच्या पथकाने आरोपींना अटक केली आहे. तेराही आरोपींना शुक्रवारी जिल्हा न्यायाधीश व विशेष न्यायाधीश (मकोका) ज्ञा.वा.मोडक यांच्या न्यायालयात हजर करण्यात आल्यावर सरकारी पक्षातर्फे दीपक आंबलकर यांनी युक्तिवाद केला. त्यानंतर न्यायालयाने १३ आरोपींना १० आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. या आरोपींना राजापेठ पोलीस ठाण्यातील कोठडीत ठेवण्यात आले आहे. बीएचआरने राजापेठ परिसरातील शाखेमार्फत गुंतवणूकदारांची १० कोटी ५२ लाखांनी फसवणूक केल्याचे उघड झाले होते. याप्रकरणी १३ जणांना जळगावहून ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने आरोपींना १० आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. - एस.डी.सोळंके, पोलीस उपअधीक्षक, सीआयडी, अमरावती
रायसोनी समूहाच्या १३ पदाधिकाऱ्यांना अटक
By admin | Published: October 07, 2016 7:18 PM