मुंबई : कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्यासोबत आपली ‘चाय पे चर्चा’ झाली होती, असा खळबज़नक खुलासा अभिनेते ऋषी कपूर यांनी आपल्या ‘खुल्लम खुल्ला ऋषी कपूर’ या आत्मचरित्रात केला आहे.‘मेरा नाम जोकर’ चित्रपटातून फिल्म इंडस्ट्रित प्रदार्पण केलेले अभिनेते ऋषी कपूर यांचे बॉबी, प्रेमरोग, सरगम, हिना, चांदणी, कर्ज आदी चित्रपट खूप गाजले. २०१६ मधील ‘कपूर अँड सन्स’ सिनेमाची चांगली चर्चा झाली. अलीकडच्या काळात ते आपल्या बिनधास्त आणि वादग्रस्त टिष्ट्वटमुळे सतत चर्चेत असतात. आता दाऊदसोबत चहापान केल्याचा खुलासा त्यांनी स्वत:हून केल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. १९८८ मध्ये दुबईत एका कार्यक्र मात सहभागी होण्यासाठी गेले असताना ऋषी कपूर यांची दाऊदशी भेट झाली होती. यावेळी दोघांमध्ये चार तास चर्चा झाली. या भेटीचा किस्सा ऋषी कपूर यांनी रोचक शब्दात वर्णिला आहे. ते लिहितात, प्रसिद्धीमुळे मला आयुष्यात चांगल्या लोकांसोबत काही संदिग्ध लोकांशी गाठ पडली. दाऊद इब्राहीम यापैकी एक होता. १९८८ साली मी माझा जवळचा मित्र बिट्टू आनंदसोबत आशा भोसले आणि आर.डी. बर्मन यांच्या एका कार्यक्र मात सहभागी होण्यासाठी दुबईला गेलो होतो. दाऊदचा एक माणूस नेहमी विमानतळावर असायचा. मी तेथून जात असताना एक अनोळखी माणूस माझ्याकडे आला. ‘दाऊद साब बात करेंगे’ असे म्हणत त्याने माझ्या हातात फोन दिला. १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटांच्या पूर्वीची ही घटना असल्याने मी त्यावेळी दाऊदला पळकुटा समजत नव्हतो. त्यावेळी तो महाराष्ट्रातील लोकांचा शत्रूही नव्हता. निदान मला तरी, तसं वाटायचं. दाऊदने माझं स्वागत केलं आणि कोणत्याही गोष्टीची गरज असेल तर मला सांग असं बोलून त्याने मला घरी येण्याचं निमंत्रण दिलं. मी या प्रकाराने आश्चर्यचकित झालो. त्यानंतर ब्रिटिशांप्रमाणे दिसणा-या एका गो-या, लट्ठ मुलाशी माझी भेट घडवण्यात आली. तो दाऊदचा राइट हॅन्ड होता. ‘दाऊद साब आपके साथ चाय पीना चाहते है’ असं तो म्हणाला. मला यामध्ये काही चुकीचं वाटलं नाही. मी निमंत्रण स्वीकारलं. त्या संध्याकाळी मला आणि बिट्टूला आमच्या हॉटेलमधून अलिशान रोल्स रॉयसमधून नेण्यात आलं. आमची कार वर्तुळाकार रस्त्याने जात होती. त्यामुळे त्याच्या घराचा नेमका पत्ता मला सांगता येणार नाही. माझा ‘तवायफ’ हा सिनेमा दाऊदला जास्त आवडला कारण यामध्ये माझं नाव दाऊद होतं. (लोकमत न्यूज नेटवर्क)>त्याला पश्चाताप वाटत नव्हतादाऊद पांढऱ्या रंगाच्या इटालियन ड्रेसमध्ये आला आणि उत्साहात त्याने आमचे स्वागत केले. ‘मी दारू पीत नसल्याने तुम्हाला चहा पिण्यासाठी बोलावले,’ असे माफी मागण्याच्या सुरात दाऊद म्हणाला. त्यानंतर चार तास आमचे चहा-बिस्किटांचे सत्र सुरू होते. त्याने अनेक विषयांवर चर्चा केली. स्वत: केलेले अपराधही त्याने सांगितले. मात्र, त्यासाठी त्याला कोणताही पश्चात्ताप वाटत नव्हता. > करायचा चोऱ्या!आमच्या भेटीत दाऊद म्हणाला, ‘मी लहान-मोठ्या चोऱ्या केल्यात, पण कधी कोणाला जीवानिशी मारले नाही. हो, पण दुसऱ्यांकरवी जरूर हत्या घडवली आहे. खोटे बोलला, म्हणून मुंबईत मी एकाची हत्या घडवून आणली. तो व्यक्ती अल्लाच्या आदेशाविरोधात वागला म्हणून आम्ही त्याच्या जिभेवर गोळी मारली, नंतर त्याच्या डोक्यात,’असे तो म्हणाला. दिग्दर्शक राहुल रवैल यांनी १९८५ मध्ये आलेल्या ‘अर्जुन’ या सिनेमात कोर्टरूम मर्डरचा सीन यावरूनच घेतला होता, असा खुलासाही ऋषी कपूर यांनी केला आहे. > भारतातून का पळाला?मला न्याय मिळणार नाही, म्हणून मी भारतातून पळालो. भारतात अनेक लोक माझ्या विरोधात आहेत. मी विकत घेतलेले लोकही तेथे आहेत. मी अनेक नेत्यांनाही खिशात घेऊन फिरतो आणि त्यांना पैसे पाठवतो, असे दाऊदने सांगितले. त्यावर मी त्याला सांगितले की, या सर्वांपासून मला दूर ठेव, मी एक अभिनेता आहे, मला यामध्ये पडायचे नाही. त्यानंतर, तो पुन्हा भेटला नाही. त्याच्या कुटुंबातील काहींशी माझी अनेकदा भेट झाली. ‘श्रीमान आशिक’ची गाणी दाऊदचा भाऊ नूरा याने लिहिली होती, असे ऋषी कपूर यांनी म्हटले आहे.
ऋषी कपूर यांची दाऊदसोबत ‘चाय पे चर्चा’!
By admin | Published: January 16, 2017 7:07 AM