लोणावळा : एकवीरा देवीच्या डोंगरावर मोठ्या प्रमाणात दरडी पडण्याचा धोका निर्माण झाला आहे. शनिवारी रात्री मंदिरालगतच्या डोंगराचे काही मोठे दगड खाली पडले असून, पायऱ्यांचा, तसेच सुरक्षा भिंतीचा भराव खचला असल्याने पावसाळ्यात दुर्घटना घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.देवीच्या दर्शनासाठी, तसेच कार्ला गडावरील लेण्या व गुंफा पाहण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यांतून भाविक व पर्यटक येत असतात. मागील वर्षी २१ जूनच्या रात्री कार्ला देवीच्या मंदिराशेजारील ट्रस्टच्या कार्यालयावर मुसळधार पावसात मोठ्या प्रमाणात दगड पडून कार्यालयाचे नुकसान झाले होते. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नव्हती. तसेच सुरक्षा भिंतीचा भराव खचून भिंतीचा काही भाग कोसळला होता. या घटनेला एक वर्ष झाले, तरी भारतीय पुरातत्त्व विभागाच्या वतीने या ठिकाणी कसलीही उपाययोजना करण्यात न आल्याने या वर्षीदेखील घटनेची पुनरावृत्ती होऊ लागली आहे.ऐतिहासिक ठेवा असलेल्या लेण्या पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांकडून भारतीय पुरातत्त्व विभाग ५० रुपये तिकीट घेते. मात्र येथे पर्यटकांच्या सुरक्षेकरिता काहीच सुविधा पुरवीत नसल्याने ऐतिहासिक वास्तू नाश पावत चालल्या आहेत.विभागाच्या उदासीनतेमुळे भाविकांसाठी धोकादायक बनले आहे. गडावर झालेल्या दुरवस्थेची दखल घेत दुर्घटना टाळण्यासाठी पुरातत्त्व विभागाने दुरुस्तीची कामे हाती घ्यावीत, अशी मागणी ट्रस्टने केली आहे. (वार्ताहर)>दुरवस्था : भराव खचून दुर्घटनेची शक्यतालोणावळा, कार्ला परिसरात अद्याप पावसाला सुरुवातदेखील झालेली नसताना शनिवारी रात्री डोंगराचे पडलेले मोठे दगड भविष्यातील घटनांची चाहूल असल्याचे बोलले जात आहे. मंदिराजवळ असलेल्या गुंफा व शंकर महादेवांच्या पिंडीसमोरील सुरक्षा भिंतीचा भराव पूर्णपणे खचला असून, दगड डोंगरावरून थेट पार्किंगमध्ये वाहनांवर पडण्याचा धोका आहे. जिन्यासमोरील मागील वर्षी पडलेली भिंत अद्याप बांधण्यात न आल्याने हे ठिकाण धोकादायक झाले आहे. अर्धा डोंगर चढून आल्यावर दोन ठिकाणी पायऱ्यांचा भराव खचला असून, कोणत्याही क्षणी या पायऱ्या वाहून जातील अशी शक्यता निर्माण झाली आहे.
दरड कोसळण्याचा धोका
By admin | Published: June 29, 2016 1:39 AM