लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मानखुर्दमधून अटक केलेल्या एमडी तस्कराच्या चौकशीतून मुंबई गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी पथकाने पुण्यातील फॅक्टरीच उद्ध्वस्त केली. गुरुवारी येथील सुजलाम फॅक्टरीला टाळे ठोकण्यात आले आहे. तसेच अटक करण्यात आलेल्या डोरजेच्या मालमत्तेची मुंबईचे अमली पदार्थविरोधी पथक कुंडली मांडणार आहे. मात्र गेल्या सहा महिन्यांतील पुण्यातील एमआयडीसी परिसरातील ही दुसरी कारवाई आहे. यापूर्वी एमडी तयार करत असलेल्या लॅबवरही कारवाई करण्यात आली होती. त्यामुळे आता ‘उडत्या’ पुण्याचा नवा धोका समोर आला आहे. मानखुर्द जकात नाक्यावर पुण्यातील तस्कर हरिश्चंद्र नानासाहेब डोरजे (५२) याला ८ किलोच्या एमडीसह अटक केली. तेव्हा त्याची कुरकुंभ येथील सुजलाम फॅक्टरी प्रकाशझोतात आली. अमली पदार्थविरोधी पथकाचे पोलीस उपायुक्त शिवदीप लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुजलाम फॅक्टरीतून कोट्यवधीचे एमडी जप्त करण्यात आले. गुरुवारी दुपारी तीन वाजेपर्यंत पथकाकडून कारवाई सुरू होती. या ठिकाणाहून एमडी तयार करण्यासाठी लागणाऱ्या रसायनांचा मोठ्या प्रमाणात साठा जप्त केला आहे. तर सुजलाम कंपनीलाही टाळे ठोकण्यात आले आहे. डोरजे याच्याकडून रसायनांसंबंधीचे परवानेही पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. गेल्या १५ ते २० वर्षांपासून सुजलाम कंपनी सुरू आहे. त्यात गेल्या दोन वर्षांपासून डोरजेने केमिकल कंपनीच्या नावाखाली एमडी तयार करण्यास सुरुवात केल्याचे समोर येत आहे.
‘उडत्या’ पुण्याचा धोका
By admin | Published: May 26, 2017 4:21 AM