- पूजा दामले, मुंबईघरातील चार जण चार कोपऱ्यात हातात मोबाइल किंवा लॅपटॉपसमोर बसलेले दिसतात. शहरांमधील हे चित्र म्हणजे तंत्रज्ञानाच्या प्रसाराचा वाईट परिणाम आहे. तथापि, हा परिणाम दिसतो तितका सरळ, साधा अजिबात नाही. या गॅजेट्सच्या वेडामुळे माणसे एकाकी होत असून त्यामुळे मानसिक आरोग्य धोक्यात येत असल्याचे मत मानसोपचारतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. १० आॅक्टोबर हा दिवस जागतिक मानसिक आरोग्य दिन म्हणून साजरा होतो. देशात अजूनही मानसिक आरोग्याविषयी म्हणावी तशी जनजागृती नाही. मानसिक आजार आणि उपचारांसंदर्भात अजूनही दुर्लक्ष केले जाते. गेल्या काही वर्षांत डिप्रेशन ही मानसिक आजारांमधील सर्वांत मोठी समस्या समजली जात होती. मात्र, सध्या ‘एकटेपणा’ ही मानसिक आरोग्याच्या दृष्टीने सर्वांत भयंकर समस्या बनत असल्याचे मानसोपचारतज्ज्ञ हरीश शेट्टी यांनी ‘लोकमत’शी बोलताना नमूद केले. गॅजेटचे व्यसन जडणे, हे एकच व्यसन मानले जात नाही. तर गॅजेटच्या अनुषंगाने अनेक व्यसने जडतात. कारण, मोबाइलच्या व्यसनांमध्ये गेम, चॅटिंग, ई-मेल्स, फोन कॉल्स, मेसेजेस अशा अनेक अॅप्लिकेशन्समुळे लोक त्यांच्याही आहारी जात आहेत. या सर्वांमध्ये व्यक्ती इतकी गुंतत जाते की, त्यामुळे आजूबाजूच्या व्यक्तींचाही विसर पडतो. नवरा-बायकोच्या नात्यांमधील दुराव्यासाठी हे प्रमुख कारण बनले आहे. गॅजेट्सच्या व्यसनामुळे बोट, डोळे आणि मेंदू सारखेच अॅक्टिव्ह राहतात. त्यामुळे माणसे इतकी थकून जातात की, त्यानंतर कोणत्याही अन्य शारीरिक क्रिया ते करु शकत नाहीत, असे डॉ. शेट्टी यांनी सांगितले.आता हवे ‘गॅजेट’ हायजिन...सध्या अनेक वस्तूंसह शरीराच्या स्वच्छतेविषयी जनजागृती होताना दिसते. प्रत्यक्षात गॅझेट्स हायजिनची आवश्यकता निर्माण झाली आहे. असा हायजिन आणण्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही गॅझेट्स घरात कुठपर्यंत आणायचे, कुठे ठेवायचे हे निश्चित केले पाहिजे. घरातील सर्व मंडळींनी रात्री १०.३० नंतर गॅजेट्स वापरू नयेत. घराच्या हॉलमध्ये सगळी गॅझेट्स एकाच ठिकाणी ठेवावीत. लॅपटॉपचा वापर बेडरूममध्ये न करता हॉलमध्येच करावा. एका दाम्पत्याची अशीही कहाणी...मुंबईतील एक दाम्पत्य उपचारासाठी आले होते. नवरा टूरवर असताना, पत्नीला एकाकी वाटत होते. काम असल्यामुळे पतीला तिच्याशी सतत बोलणे शक्य नव्हते. या काळात व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून पत्नी तिच्या शाळकरी मित्राच्या संपर्कात आली. हळूहळू दोघांमधील संबंध दृढ होत गेले. टूरवरून आल्यावर हा प्रकार पतीच्या लक्षात आला. पहिल्यांदा पत्नीने यासंदर्भात आपले काही चुकले हे मान्य केले नाही. नंतर सगळा घटनाक्रम हळूहळू उलगडत गेला. त्यानंतर नक्की काय घडले, याचा उलगडा पत्नीला झाल्याचे मानसोपचारतज्ज्ञ डॉ. हरीश शेट्टी यांनी सांगितले. सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून गोष्टी इतक्या वेगाने घडत जातात. अनेक नात्यांमध्ये दुराव्याची शक्यता निर्माण होते. समुपदेशनामुळे यातून मार्ग निघतो, असे डॉ. शेट्टी यांनी सांगितले. तरुणांमध्येही वाढतोय मानसिक ताण!गेल्या १० वर्षांमध्ये मोबाइल आणि इंटरनेटच्या क्रांतीमुळे तरुण पिढीला ‘व्हॉट नेक्स्ट’ हा प्रश्न सतावू लागला आहे. अजून महागडा, अॅडव्हान्स टेक्नॉलॉजीच्या मोबाइल, गॅजेट्सकडे यांचे लक्ष असते. सोशल नेटवर्किंग साइट्सच्या आभासी जगात ही तरुणाई जगते. कुटुंबापासून डिसकनेक्ट होत जातात. आभासी जगात अधिकाधिक वेळ गेल्याने कालांतराने मानसिक ताण उसळतो. एका क्लिकवर जग उपलब्ध झाल्याने मानसिक समस्या वाढत आहेत. नातेसंबंध दुरावून एकटेपणा येतो. त्यातूनच आत्महत्यांचे विचार मनात डोकावू लागत असल्याचे वोक्हार्ट रुग्णालयातील मानसोपचारतज्ज्ञ डॉ. सोनल आनंद यांनी सांगितले.
मानसिक आरोग्याला ‘गॅजेट’चा धोका
By admin | Published: October 10, 2015 4:31 AM