रत्नागिरी : राज्याच्या सागरी क्षेत्रात विशेषत: कोकण किनारपट्टीवर २ ते ४ जुलै २०१५ या कालावधीत देशविरोधी प्रवृत्तींकडून घातपाती कारवायांची शक्यता असून, त्यासाठी पोलीस, सागरी सुरक्षा दल व नागरिकांनीही सतर्क राहावे, असा बिनतारी संदेश राज्याच्या पोलीस महासंचालकांनी जिल्हा पोलीस यंत्रणेला दिला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा सतर्क झाली असून, सागरी सुरक्षेवर सर्वाधिक भर दिला जात आहे. सागरी पोलीस स्थानकांनी अधिक कार्यक्षमतेने सागरी किनाऱ्यावर करडी नजर ठेवली आहे. पावसाळ्यात कोकणच्या सागरी क्षेत्रातील मासेमारी २ महिने बंद ठेवली जाते. हा कालावधी मासळीच्या प्रजननाचा असल्याने ही बंदी घातली जाते. तसेच पावसामुळे समुद्रही खवळलेला असतो. याकरिता सर्वच मच्छीमारी नौका किनाऱ्यावर, बंदरात उभ्या केल्या जातात. मासेमारी बंद असल्याने या काळात समुद्रातील वावर कमी असतो. त्याचाच गैरफायदा घेऊन देशविरोधी प्रवृत्तींद्वारे किनारपट्टी भागात घातपाती कृत्य घडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसा इशारा राज्याच्या पोलीस खात्याला गुप्तचर यंत्रणांकडून दिला गेल्याने पोलीस महासंचालकांनी सागरी सुरक्षेबाबत सतर्कतेचे आदेश दिले आहेत. सागरी सुरक्षेसाठी निर्माण केलेल्या पोलीस ठाण्यांकडून सागरी किनाऱ्यांवर गस्त वाढविण्यात आली आहे. पावसाळा असल्याने समुद्र खवळला आहे. पोलीस, कस्टम यांच्याकडे स्पीड बोटी असूनही त्यांचा वापर करणे शक्य होणारे नाही. मात्र, तटरक्षक दलामार्फत उपग्रह यंत्रणेद्वारे सागरी क्षेत्रावर लक्ष ठेवले जात आहे. सागरी किनाऱ्यावरील सुरक्षेला सर्वाधिक महत्त्व देण्याचा संदेश पाहता पोलिसांकडून ग्रामसुरक्षा दलांना सतर्क करण्यात आले आहे. पावसाळ्यात सागरात गस्त घालणे शक्य नसल्याने सागरात काही संशयास्पद हालचाली होत असल्याचे आढळून आल्यास नागरिकांनी, ग्रामसुरक्षा दलांनी तत्काळ त्याबाबतची माहिती पोलीस यंत्रणेला द्यावी, असे आवाहनही करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून इसिस भारतात घातपाती कारवाया करण्याच्या तयारीत असल्याच्या बातम्या प्रसारमाध्यमांतून पुढे येत आहेत. त्यामुळे गुप्तचर यंत्रणाही सतर्क झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर मिळालेल्या माहितीच्या आधारे राज्यभरातील पोलीस यंत्रणेला सतर्क करण्यात आले आहे.मुंबईतील बॉम्बस्फोट मालिकेसाठी वापरण्यात आलेले आरडीएक्स रायगड जिल्ह्यातील शेखाडी येथून उतरवून नेल्याचे नंतर तपासात स्पष्ट झाले होते. अलिकडेच सागरी सुरक्षा कवच अभियानदरम्यान जिल्ह्यात राबविण्यात आले होते. सागरी क्षेत्रातून येणाऱ्या डमी घातपाती व्यक्तींना पकडण्याचे प्रशिक्षण दिले होते. कोकणातील किनाऱ्यांचा अशा कारवायांसाठी वापर केला जाण्याची दाट शक्यता असल्याने ही सतर्कता दाखवली जात आहे. (प्रतिनिधी)४ जुुलैपर्यंत सागरावर करडी नजर...पोलीस, सागरी सुरक्षा दल व नागरिकांनाही सतर्कतेचे आदेश.जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा सतर्क.सागरी पोलीस ठाण्यांकडून सागरी कनाऱ्यांवर विशेष गस्त.इसिस भारतात घातपाती कारवाया करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा.तटरक्षक दलामार्फत उपग्रह यंत्रणेव्दारे सागरी क्षेत्रावर लक्ष.पोलीस महासंचालकांच्या आदेशाने यंत्रणा सतर्क.
घातपाताचा धोका..!
By admin | Published: July 02, 2015 10:42 PM