हणमंत पाटील/लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी (पुणे) : महसूल विभागाच्या आशीर्वादाने मावळातील पवना धरण परिसरात बेकायदा उत्खनन सुरू आहे. डोंगरउतारावरील उत्खनन न थांबविल्यास आंबेगाव तालुक्यातील ‘माळीण’ची पुनरावृत्ती होऊन पवन मावळातील गावांना धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. पवन मावळमधील भडवली, शिवली, मळवंडी ठुले, येलघोल, धनगव्हाण या गावामध्ये रॉयल्टी भरून रात्री बेकायदा उत्खनन होत आहे. डोंगरउतारावरील माती उत्खनन चालू राहिल्यास खालच्या भागातील गावांच्या अस्तित्वाला धोका आहे. पवना धरण परिसरामुळे मातीमाफियांची नजर या गावांवर पडली आहे. सुपीक माती नर्सरी व फुलशेतीला उपयुक्त आहे. तसेच, डोंगरउतारावरील चांगला मुरूम परिसरातील गृहप्रकल्पांसाठी विकला जात आहे. डोंगरावरून येणारे पाणी थेट गावात शिरून पूर परिस्थितीदेखील निर्माण होण्याची शक्यता आहे. मातीमाफियांच्या बेकायदा उत्खननाचा सर्वाधिक फटका धनगव्हाण व येलघोल या गावांना बसला आहे.रात्री रॉयल्टीपेक्षा जास्त मातीची चोरीमाती उत्खनन परवाना हा सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंतच असतो. परंतु मातीमाफिया हे दिवसा कमी आणि रात्री मोठ्या प्रमाणात मातीची चोरी करतात. माती उत्खनन करण्याची रॉयल्टी ही सरकारी नियमाप्रमाणे एक ब्रासला १६० रुपये, तर मुरु माचे ४०० रु पये भरावी लागते. परंतु मातीचोर काढलेल्या रॉयल्टीपेक्षा रात्री जास्त माती चोरत आहेत. पवना धरणाजवळ असणाऱ्या मळवंडी ठुले धरणाजवळ राजरोस मातीचे उत्खनन सुरू आहे. एका मातीमाफियाने शेती करण्यासाठी डोंगरउतारावरील जमीन खरेदी केली. त्यानंतर डोंगर पोखरून त्यात रस्ता तयार केला असून, डोंगर पूर्ण भुसभुशीत केला आहे.मातीमाफियांनी माती व मुरूम विक्रीबरोबरच ग्रामस्थांना बरोबर घेऊन वीटभट्टीचा व्यवसाय सुरू केला आहे. त्यामुळे परिसरात वीटभट्टी व फुलशेती व्यवसाय वाढत आहे.पवनानगर परिसरातील अमरजा हिल्स, शिळीब, पुणे, येलघोल या गावांत मातीची बेकायदा वाहतूक करणाऱ्या ५५ वाहनांवर कारवाई करून २८ लाखांचा दंड वसूल केला आहे. तसेच अनधिकृतपणे उत्खनन करणाऱ्यांच्या सातबाऱ्यावर ७ कोटी ७४ लाखांचा बोजा चढविण्यात आला आहे. - जोगेंद्र कट्यारे, तहसीलदार, मावळ, जि. पुणे
मावळात ‘माळीण’च्या पुनरावृत्तीचा धोका
By admin | Published: May 29, 2017 4:35 AM