कांता हाबळे । लोकमत न्यूज नेटवर्कनेरळ (रायगड) : माथेरान येथे जगभरातून पर्यटक येत असतात; परंतु माथेरान मार्गावर कोसळणाऱ्या दरडींमुळे पर्यटकांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात दरड कोसळण्याच्या घटना घडतात, तरीही एमएमआरडीएने या घाटमार्गाकडे दुर्लक्ष केले आहे. मागील वर्षी माथेरान घाटमार्गावर अनेक वेळा दरडी कोसळून घाटमार्ग बंद झाला होता. या वर्षी पावसाळा सुरू झाला, तरी ज्या ठिकाणी दरडीचा संभाव्य धोका आहे, अशा ठिकाणी जाळ्या बसविण्यात आल्या नसल्याने प्रवासी व वाहनचालक जीव धोक्यात घालून प्रवास करीत आहेत. माथेरान घाटमार्गावर सुमारे चार कि.मी. अंतरावर दरडी कोसळण्याचा धोका आहे. काही भागांत संरक्षक कठडे तुटलेले यामुळे घाटमार्गावरील प्रवास धोकादायक झाला आहे. घाटमार्गावर असलेली नागमोडी वळणे, असून तेथे वाहन पुढे आल्याशिवाय दिसत नाही. विशेषत: पावसाळ्यात दाट धुक्यात वाहनचालकांना वाहनाचा अंदाज येत नाही. यासाठी घाटमार्गावर आवश्यक ठिकाणी सूचना फलक व दिशादर्शक फलक लावणे गरजेचे आहे.
माथेरान घाटात दरडीचा धोका
By admin | Published: June 28, 2017 1:58 AM