महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांची आज 75 वी जयंती. प्रसन्न, दिलखुलास, अजातशत्रू व्यक्तिमत्व आणि चतुर, सर्वसमावेशक अन् बेधडक नेतृत्व ही विलासरावांची ओळख. त्यांच्या अनेक आठवणी त्यांच्या समर्थकांच्या, काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मनात आजही कायम आहेत. आजच्या राजकीय परिस्थितीत विलासराव हवे होते, असं म्हणणारेही खूप जण आहेत.
विलासराव देशमुख यांच्या जयंतीदिनी काँग्रेस कार्यकर्ते सोशल मीडियावरून त्यांना अभिवादन करत आहेत. देशमुख परिवाराने दिवंगत विलासराव देशमुख यांच्या असंख्य आठवणी जपून ठेवल्या आहेत. मांजरा कारखान्यावर भव्य स्मृतिस्थळ उभारले आहे. दरवर्षी या दिवशी त्यांच्या समाधीस्थळावर जयंती साजरी केली जाते. यावर्षी लॉकडाऊनमुळे ते शक्य नाही. देशमुख कुटुंबीयांनी घरच्या घरीच विलासरावांच्या स्मृतींना वंदन केलं. विलासरावांचा सुपुत्र अभिनेता रितेश देशमुखनं एका हृदयस्पर्शी व्हिडीओतून चाहत्यांना आपल्या वडिलांची भेट घडवली आहे. विलासरावांच्या 'व्हर्च्युअल स्पर्शा'नं रितेशलाही गहिवरून आल्याचं व्हिडीओत दिसतं.
विलासरावांचं जॅकेट न्याहाळत असताना त्यातून त्यांचा हात बाहेर येतो आणि रितेशच्या डोक्यावरून मायेनं फिरतो, त्याची पाठ थोपटतो, असा एक क्रिएटिव्ह व्हिडीओ रितेशनं सोशल मीडियावर शेअर केला आहे. बाप-लेकाची ही गळाभेट पाहताना मन आणि डोळे भरून येतात. या व्हिडीओवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतोय. विलासराव आणि रितेशचं नातं किती घट्ट होतं, हे त्यातून स्पष्टपणे जाणवतं. याआधीही वडिलांच्या आठवणीनं रितेश खूपदा हळवा झाला आहे.