>> राजा माने
दैनिक लोकमतच्या महाराष्ट्रीयन ऑफ द इयर 2019 या कार्यक्रमात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहभागी झाले होते. या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांची अभिनेते रितेश देशमुख यांनी प्रकट मुलाखत घेतली. त्यावेळी ही मुलाखत खूप गाजली होती, तर अनेक माध्यमांनी याची दखल सुद्धा घेतली होती. त्याचप्रमाणे दोन दिवसांपूर्वी डॉ़ शंकरराव चव्हाण जन्मशताब्दी वर्षानिमित्त ‘आनंदाचे डोही’ या कार्यक्रमांतर्गत रितेश देशमुख यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण आणि त्यांच्या पत्नी अमिता चव्हाण यांची प्रकट मुलाखत घेतली असून त्याचीही चर्चा होताना पाहायला मिळत आहे.
ज्यांच्या आसपासही जाताना भले भले दहावेळा विचार करायचे.. त्यांच्याशी नेमके काय बोलायचे, हे विचारचक्र भेदताना अनेकांची धांदल उडायची.. असा दबदबा असणाऱ्या राजकारणातील "हेडमास्तर"ही उपाधी कधी गमतीने, कधी आदराने तर कधी राजकीय उपहासाने महाराष्ट्राने बहाल केली होती, अशा द्रष्ट्या व्यक्तिमत्त्वाचा सहवास लाभणे ही भाग्याची गोष्ट! बरं, थोडा बहुत सहवास लाभला तरी त्या व्यक्तीला खळखळून हसवू शकणे, हे तर परम भाग्यच! ते भाग्य मला लाभले. होय.. मी मराठवाड्याने देशाला बहाल केलेल्या महान द्रष्ट्या व्यक्तिमत्त्वाबद्दलच बोलतोय.. लोकनेते स्वर्गीय शंकररावजी चव्हाण! त्यांनाच मी खळखळून हसविले होते.
१९९०च्या दशकातील ही गोष्ट. मी त्यावेळी स्व. विलासराव देशमुख यांच्या लातूर येथून प्रकाशित होणाऱ्या दैनिक एकमतचा संपादक होतो. जशी शरद पवारांची "यशवंतराव चव्हाण यांचे मानसपुत्र", अशी ओळख महाराष्ट्राला होती, तशीच ओळख "शंकरराव चव्हाण यांचे मानसपुत्र" अशी विलासरावांची होती. त्यामुळे शंकररावजींना अनेकवेळा भेटण्याची, त्यांच्या संपर्कात राहण्याची संधी मला लाभली. त्याच काळात विलासरावांनी मोठ्या हौसेने माझ्या अग्रलेखांच्या संग्रहाचे "अग्निपंख" हे पुस्तक मुंबईतील पंचतारांकित हॉटेलात दिमाखात प्रकाशित केले होते. त्यावेळी ते महसूल व सांस्कृतिक कार्य मंत्री होते. प्रकाशन सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून तत्कालीन नगरविकास राज्यमंत्री अशोक चव्हाण तर कार्यक्रमाचे यजमान म्हणून लातूरचे नगराध्यक्ष एस. आर. देशमुख व एकमतचे कार्यकारी संचालक जयसिंगराव देशमुख(मामा) उपस्थित होते.
देश आणि महाराष्ट्र त्यावेळी कॉंग्रेसमय होता. त्याच काळात विलासरावांना "राजबिंडा भावी मुख्यमंत्री" हे लोकप्रिय बिरुद महाराष्ट्राने लावलेले होते. त्यामुळे विलासरांच्या दैनिकाचा संपादक म्हणूनही मला वेगळी अतिरिक्त ओळख महाराष्ट्रात लाभली होती. असो. मुंबईत प्रकाशन झाले आणि ते पुस्तक प्रत्यक्ष भेटून शंकरराव चव्हाणांना भेट देण्याची इच्छा मी विलासरावांकडे व्यक्त केली. त्यांनी तात्काळ होकार तर दिलाच शिवाय चव्हाण साहेबांच्या नांदेड दौऱ्यात भेटीची व्यवस्था केली. शंकरराव त्यावेळी केंद्रीय गृहमंत्री होते. त्यांचा नांदेड दौरा ठरला. साहेबांच्या निवासस्थानी भेटीची वेळ ठरली. त्यावेळचे आमचे वार्ताहर पावडे यांना सोबतीला घेऊन मी त्यांच्या दिवाणखान्यात प्रवेश केला. काही मिनिटातच साहेब आले. शिस्तबद्ध प्रास्ताविक गप्पा सुरू झाल्या. अगदी एखाद्या गंभीर विषयावर बैठक चालावी तशा! मला मोकळं-चाकळ बोलायची सवय. तसे काही होईना.अखेर त्यांना नांदेड जिल्ह्याच्या राजकारणावरील माझ्या पुस्तकातील एका अग्रलेखाचा काही अंश वाचून दाखविण्याची इच्छा मी व्यक्त केली. सुदैवाने त्यांनी ती मान्य केली आणि मी कविता वाचनाला उभे राहावे तसा उभा ठाकलो!
त्याकाळात नांदेड जिल्ह्याचं राजकारण चव्हाण-कदम गटांत चांगलेच तापलेले होते. त्यात तो अग्रलेख उपहासात्मक आणि विनोदी शैलीत होता. जसा जसा मी वाचत गेलो तसतसा साहेबांचा मूड बदलत गेला आणि सरतेशेवटी त्यांच्या आणि आमच्या खळखळून हास्यानेच अग्रलेख वाचनाचा समारोप झाला.
स्वर्गीय चव्हाण साहेबांना त्यांच्या कुटुंबात "नाना" असे संबोधले जायचे. मी त्यांना नानाच म्हणायचो. कठोर प्रशासन, अनेक भाषांवर कमालीचे प्रभुत्व, प्रत्येक विषयावरील सखोल अभ्यास आणि भविष्याचा अचूक वेध घेणारी विधायक दृष्टी ही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची बलस्थाने होती. त्याच बलस्थानाने मराठवाड्याचे भाग्य पालटणारा जायकवाडी प्रकल्प दिला. मातीकामाचे जगातील सर्वात मोठे धरण म्हणून ओळख असलेल्या जायकवाडी धरणास जानेवारी १९७३ मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी शंकररावजींचे विशेष कौतुक केले होते. पाटबंधारे खात्याचे नाव घेतले की आज तुमच्या-आमच्या अंगावर काटा येतो! पण त्या जमान्यात काटकसरीने काम करून जायकवाडी धरणाच्या कामात २ कोटी ७० लाख रुपयांची बचत पाटबंधारे खात्याच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी केली होती. या सोळा टक्के बचतीची शाबासकी म्हणून पाटबंधारे खात्याच्या कर्मचाऱ्यांना चार लाखांची बक्षिसेही देण्यात आली होती.
स्वर्गीय शंकररावजींचे जन्म शताब्दी वर्ष सध्या साजरे होत आहे. त्यानिमित्ताने नांदेडमध्ये अशोकराव चव्हाण व त्यांच्या पत्नी अमितावहिनीची मुलाखत रितेश देशमुख आज घेणार आहेत. याच घटनेमुळे माझ्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या. स्व.विलासराव हे स्व.शंकररावजींचे मानसपुत्र होते. त्या नात्याने रितेश "मानसनातू"! बॉलीवूड गाजविणारा ख्यातकीर्त अभिनेता रितेश विलासराव देशमुख हा अभिनेता नव्हे तर शंकररावजी तथा नानांचा लाडका "मानसनातू" रितेश नानांचा लाडका लेक अशोकची मुलाखत घेतोय, असा हा दुर्मिळ आणि अविस्मरणीय क्षणच!
अशोकराव आणि माझे स्नेहसंबंध १९८७ पासूनचे. त्यावेळी प्रदेश युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष म्हणून त्यांचा नुकताच राजकरण प्रवेश झाला होता. अगदी डॉ.व्यंकटेश काब्दे यांच्या कडून लोकसभा पोटनिवडणुकीत झालेल्या पराभवापासून संघर्षांचे अनेक चटके सोसत परवाच्या लोकसभा निवडणुकीतील पराभवापर्यंतच्या त्यांच्या संघर्षमय वाटचालीत त्यांचा स्नेह कधी कमी झाला नाही. संघर्ष करण्याची उपजत क्षमता, कल्पक दृष्टी, संघटन कौशल्य आणि दिलदार शैली या बळावर त्यांनी मुख्यमंत्रीपदापर्यंत मजल मारली. जीवनाच्या प्रत्येक वळणावर स्वर्गीय नानांचा आठवणी त्यांना प्रेरणा देत असतील. सौ.अमितावहिनी देखील अशोकरावजींच्या खांद्याला खांदा लावून राजकारणात सक्रीय आहेत. त्या दोहोंचा जीवन प्रवास आणि स्व.नाना या विषयीचे त्यांचे अंतरंग रितेश कसे उलगडणार, हाच औत्सुक्याचा भाग! पाहू तर मग... स्वर्गीय शंकररावजी चव्हाण यांनी श्रद्धापूर्वक अभिवादन.
(लेखक लोकमतचे राजकीय संपादक आहेत.)