लोकमत कार्यालयास भेट : उलगडली चित्रपटनिर्मितीची कहाणी
मराठी चित्रपटात अभिनेता म्हणून प्रथमच भूमिका रंगवणा:या रितेश देशमुखचा ‘लय भारी’ हा चित्रपट बराच चर्चेत आहे. याआधी मराठी चित्रपटसृष्टीत निर्माता म्हणून उतरलेल्या रितेशने मराठीत अभिनेता म्हणून पदार्पण करताना लय भारी चित्रपट निवडला आणि याच चित्रपटाचे औचित्य साधून अभिनेता रितेश देशमुख, निर्माते अमेय खोपकर आणि एस्सेल व्हिजनचे बिझनेस हेड निखिल साने यांनी ‘लोकमत’च्या वरळी कार्यालयात लय भारी वारी केली. या वारीचा वृत्तान्त खास लोकमतच्या वाचकांसाठी..
हा आमचा पहिला चित्रपट आहे. याआधी आम्ही लघुपट व मालिका केल्या होत्या. लय भारी या चित्रपटाचा विषय आम्ही रितेश देशमुख यांना ऐकवला, याचे कारण म्हणजे आम्हाला या चित्रपटासाठी तेच हवे होते. दुस:या कुणाला घेऊन हा चित्रपट होऊ शकत नाही, यावर आम्ही ठाम होतो. मराठी चित्रपट चालत नाहीत किंवा मराठी चित्रपटांना थिएटर्स मिळत नाहीत, हे चुकीचे असल्याचे आम्हाला दाखवून द्यायचे होते. लोकांर्पयत चांगले चित्रपट आणले, तर ते नक्की चालतात. गेल्या काही काळात हे अनेक चित्रपटांनी दाखवून दिले आहे, त्यामुळे आम्ही हा एक प्रामाणिक प्रयत्न केला आहे. कुठेही तडजोड करायची नाही, यावरही आम्ही ठाम होतो.
- अमेय खोपकर, निर्माता, सिनेमंत्र
रितेश देशमुख :- लय भारी या चित्रपटाच्या निमित्ताने मला लोकांचे प्रचंड प्रेम मिळाले. अनेक वर्षे मी हिंदी चित्रपटसृष्टीत काम करतोय, पण ते करत असताना नेहमी वाटत होते की मराठीतसुद्धा काम करावे. माङो वडीलही मला विचारायचे की तू हिंदी चित्रपटात काम करतोस, तर मराठीत कधी काम करणार? पण अचूक वेळ येण्यासाठी मी थांबलो होतो. मध्यंतरीच्या काळात सिनेमंत्रची टीम माङयाकडे आली आणि त्यांनी सुचवलेला विषय मला आवडला. हा विषय मला वेगळा वाटला. लय भारी हा चित्रपट म्हणजे आमचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. एक पूर्णत: व्यावसायिक चित्रपट द्यायचा असाच आमचा यामागे हेतू आहे.
हिंदी चित्रपटाशी आमची स्पर्धा असावी असे काही मनात नव्हते, पण आमचा आमच्या चित्रपटावर आत्मविश्वास आहे. मुळात कथा वाचल्यावरच चित्रपट काय आहे ते समजते. आता इतकी वर्षे या इंडस्ट्रीत असल्याने हा अनुभव आहेच. हिंदी आणि दक्षिणात्य भाषेत अशा प्रकारचे चित्रपट झाले असले, तरी मराठीत मात्र हा वेगळा प्रकार आम्ही आणला आहे. आम्ही हा संपूर्ण व्यावसायिक चित्रपट केला आहे आणि त्यामुळे याकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा ठेवला पाहिजे. मी याआधी ‘बालक पालक’ आणि ‘यलो’च्या निमित्ताने मराठी चित्रपटनिर्मिती केली; परंतु लय भारी हा चित्रपट त्या पठडीतला नाही. हा फेस्टिव्हलचा चित्रपट नाही. पण या चित्रपटाने थिएटरमध्येच फेस्टिव्हल होईल याची मला खात्री आहे.
या चित्रपटाच्या आधीही माङयाकडे मराठी चित्रपटांसाठी विचारणा झाली होती, पण तेवढी सशक्त कथा मला सापडत नव्हती. त्यामुळे मी चांगल्या कथेच्या शोधात होतो आणि त्याचवेळी माङयासमोर लय भारीची कथा आली.
ही कथा पाहिल्यावर हा चित्रपट करायचा हे पक्के झाले. मी एक अभिनेता आहे. त्यामुळे ठरावीक चित्रपटच करायचे असे काही ठरवले नव्हते. मी आतार्पयत कौटुंबिक चित्रपटही केले आहेत, तसेच विनोदी चित्रपटही केले आहेत. विनोदी चित्रपट हासुद्धा एक प्रकारचा जॉनर आहे आणि मी तो स्वीकारला. पण माङया या प्रकारच्या भूमिकांपेक्षा एक वेगळा लूक लय भारीमध्ये आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून माझी इमेज तोडण्याचा प्रयत्न सुरू आहे.
लय भारी या चित्रपटाच्या शीर्षकातच सर्वकाही आहे. या चित्रपटातील माउली या पात्रचे वागणो या शीर्षकात आहे. आपण करतो तेच लय भारी अशी या पात्रची विचारसरणी आहे. लय भारी या शब्दात दम आहे, आपुलकी आहे आणि आपलेपण आहे. हा शब्द प्रत्येकाला आपला वाटतो आणि प्रत्येक जण हा शब्द स्वत:च्या खास पद्धतीने वापरतो. या शीर्षकातून आपलेपणा जाणवतो आणि यातच या चित्रपटाचे यश आहे.
मी लातूरचा आहे, त्यामुळे माझी भाषा त्या वळणाची आहे. मुंबईत राहून भाषा थोडी बदलली. या चित्रपटात मात्र दोन्ही प्रकारची भाषा वापरली आहे. यात माउलीची जी भाषा आहे, ती माङया गावाची भाषा आहे. या चित्रपटात आम्ही प्रामाणिकपणा जपला आहे. यात जी वारक:यांची दृश्ये आहेत, त्यात खरोखरच वारकरी आहेत. त्यांच्याऐवजी कुणी कलाकारांनी यात वारक:यांच्या भूमिका केलेल्या नाहीत. आम्ही या चित्रपटाबद्दल सकारात्मक दृष्टिकोन ठेवला आहे. मी या चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी ज्या ज्या भागांत दौरे केले, त्या त्या भागांत मला लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे. मराठी लोकांनी मराठी चित्रपट जर पाहिले नाहीत, तर आपली इंडस्ट्री टिकाव धरणार नाही, असे मला वाटते. पण यात महत्त्वाचे असे की आपणही त्यांच्या अपेक्षा पूर्ण होतील असे प्रॉडक्ट द्यायला पाहिजे. मराठी चित्रपट हा मराठी प्रेक्षकाला आपला वाटला पाहिजे.
- शब्दांकन : राज चिंचणकर