पुणे : जुन्यांचा मान आणि नव्यांचा सन्मान हे सूत्र पूर्वीपासून संपादकांनी जोपासले आहे. विषयांचे नियोजन, लेखकांची निवड यासाठी संपादकाकडे विधायक दृष्टी, सखोल वाचन असावे लागते. लेखनासाठी त्यांनाही रियाझ आवश्यक असतो. मराठी भाषेच्या संवर्धनाची जबाबदारी लेखकांप्रमाणे वाचकांचीही आहे. आपली मुले, नातवंडे मराठी वाचतात का, याचा शोध स्वत:च्या घरापासून सुरू करायला हवा. मराठी समृद्ध असल्यामुळे लोप पावणारच नाही; मात्र भाषेचा अधिकाधिक विस्तार झाला पाहिजे, असे मत ज्येष्ठ लेखिका इंदुमती जोंधळे यांनी व्यक्त केले.महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या दिवाळी अंक स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ मसापच्या पटवर्धन सभागृहात शुक्रवारी पार पडला. इंदुमती जोंधळे अध्यक्षस्थानी होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून ‘लोकमत’चे संपादक विजय बाविस्कर उपस्थित होते. कोशाध्यक्ष सुनीताराजे पवार, आमंत्रक वि. दा. पिंगळे व्यासपीठावर होते. विजय बाविस्कर म्हणाले, ‘‘महाराष्ट्राला दिवाळी अंकांची १०७ वर्षांची अखंडित परंपरा लाभली आहे. प्रदीर्घ, गौरवशाली प्रवास असलेला दिवाळी अंक म्हणजे अक्षरोत्सव, ज्ञानोत्सव असतो. ज्ञान हाच प्रकाश आणि प्रकाश हेच ज्ञान, हे सूत्र दिवाळी त्यामधून प्रतीत होते. दिवाळी अंकांनी वाचनसंस्कृती रुजवली आणि जोपासली. भाषा समृद्ध असेल तर संस्कृतीही समृद्ध होते. भाषा टिकविण्याचे, मूल्यव्यवस्था जपण्याचे काम या अंकांनी केले आहे.’’ महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या या उपक्रमाचे आणि पुरस्कारार्थींचे त्यांनी आवर्जून अभिनंदन केले.ज्योत्स्ना चांदगुडे, अनिल सोलंकर, धनंजय गुंजाळ तसेच नमिता कीर, किरण केंद्रे यांनी मनोगत व्यक्त केले. मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी स्वागतपर प्रास्ताविक केले. उद्धव कानडे यांनी सूत्रसंचालन केले. प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)>पुरस्कारार्थी पुढीलप्रमाणेबाळकृष्ण कवठेकर (अंतर्नाद), नमिता कीर (झपुर्झा), ॠता बावडेकर (साप्ताहिक सकाळ), हितेंद्र नाईक (चतुरंग अन्वय), किरण केंद्रे (किशोर), लक्ष्मीकांत देशमुख (बाटगी विहीर, उद्याचा मराठवाडा), वसंत आबाजी डहाके (अर्धनारीश्वर, पुणे पोस्ट) व सायली राजाध्यक्ष (डिजिटल).>एखादा लेखक समाजाविषयी लिहितो, तेव्हा सर्वसमावेशक चित्रण करण्याचा त्याचा प्रामाणिक प्रयत्न असतो. त्याबाबत समाजाकडून विपरित मते व्यक्त होऊ शकतात. जे. पी. मुरुग्गन प्रकरणाबाबत ‘लेखक पुनरुज्जीवित झाला आहे’ असा निर्णय मद्रास उच्च न्यायालयाने लेखकाच्या भावना, संवेदना जाणून घेऊन दिला. तो अत्यंत वाचनीय आहे. याबाबतच्या ‘अर्धनारीश्र्वर’ या लेखासाठी मला मिळालेला हा पुरस्कार म्हणजे अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा गौरव आहे.- प्रा. वसंत आबाजी डहाके
लेखनासाठीही रियाझ आवश्यक
By admin | Published: January 21, 2017 1:05 AM