ऑनलाइन लोकमत
लोणावळा, दि. 8 - भुशी धरण, लायन्स पाँईट, गिधाड तलाव या परिसरात जाणारा मार्ग लोणावळा शहर पोलिसांनी जाहीर केल्याप्रमाणे आज दुपारी तीन वाजता कुमार चौकात चारचाकी वाहनांसाठी बंद केला होता. दुचाकी वाहने व पायी जाणार्यांना मात्र कोणतेही निबर्धं घालण्यात आले नव्हते. वाहतुक नियंत्रणासाठी सात पोलीस अधिकारी व 100 पोलीस कर्मचारी असा बंदोबस्त लोणवळा ते भुशी धरण परिसरात नेमण्यात आला होता.
शनिवार व रविवार तसेच सुट्टीच्या दिवसात पावसाळी पर्यटनासाठी लोणावळा परिसरातील भुशी धरण, लायन्स व टायगर पाँईट, गिधाड तलाव, सहारा पुल धबधबा, अँम्बे व्हँली परिसरात लाखोंच्या संख्येने पर्यटक येत असल्याने मार्गांवर प्रचंड मोठ्या प्रमाणात वाहतुक कोंडी होऊन अवघ्या काही मिनिटांच्या अंतरासाठी स्थानिकांसह पर्यटकांना चार ते पाच तास वाहतुक वाहतुक कोंडीचा सामना करावा लागत आहे. सुरक्षेच्या दृष्टीने हे अतिशय घातक असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून धरण परिसरात जाणारा मार्ग दुपारी तीन वाजता बंद करण्याचा निर्णय पोलीस प्रशासनाने घेतला असून त्याची अंमजबजावणी आजपासून करण्यात आली. सायंकाळी पावणेसहा वाजता वाहतुकीची परिस्थिती पाहून पुन्हा धरणाकडे जाणारी वाहतुक सुरु करण्यात आली.