करंजगाव : नाणे मावळ येथील कांब्रे ते कोंडिवडे या रस्त्याचे काम निकृष्ट झाल्यामुळे हा रस्ता खचला आहे. या रस्त्याचे काम निकृष्ट झाल्याची कबुली देत हा रस्ता नव्याने करण्यात येईल, असे आश्वासन मागील वर्षात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षकांनी दिले होते. परंतु, या रस्त्यासंदर्भात प्रशासनाने कोणतीच पावले उचलली नसल्याने दोन वर्षांपासून हा रस्ता ‘जैसे थे’च आहे. कांब्रे ते कोंडिवडे या रस्त्याचे डांबरीकरण २ वर्षांपूर्वी झाले असून, हा रस्ता सुमारे अकराशे मीटर लांबीचा आहे. यामध्ये ५०० व ६०० मीटर लांब असे दोन भाग असून, हा रस्ता एकतीस लाख रुपये खर्च करून रस्ता तयार करण्यात आला. परंतु, आज त्या कांब्रे ते कोंडिवडे रस्त्यावर खड्डेच खड्डे पडलेले आहेत. गावातील रस्त्याचीही मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. या रस्त्याच्या आजूबाजूला रहदारी असल्यामुळे घरांचे सांडपाणी त्या रस्त्यावर साचते. पाणी साचल्यामुळे रस्त्यावरचे डांबर, खडी खराब होत आहे. त्या ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून, त्यामध्ये सांडपाणी साचत आहे. एखादी गाडी त्या ठिकाणाहून गेल्यास तेथून ये-जा करणाऱ्या प्रवाशांच्या अंगावर खड्ड्यातील सांडपाणी उडते. यातून वादावादीच्याही घटना घडत आहेत. रस्त्याच्या अशा परिस्थितीमुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. या रस्त्याच्या कामात मोठा भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे. (वार्ताहर)>दोन वर्षांतच हा रस्ता पूर्ण खराब झाला आहे. रस्ता दुरुस्तीबाबत वारंवार संबंधित विभागाला कळवूनही याकडे दुर्लक्ष होत आहे. यासह कांबरे फाटा येथील रस्ता करण्यात आला आहे. मात्र, तेथील अर्धवट ठेवलेला रस्ता कधी पूर्ण होणार? व रस्त्याचे खड्डे कधी बुजणार? असा मुद्दा उपस्थित केला जात आहे. याकडे जाणारे-येणारे नागरिक , शाळकरी मुले यांना खूप मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अर्धवट सोडलेला रस्ता पूर्ण करावा व रस्त्यावरचे खड्डे बुजवावे, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत.
निकृष्ट कामाने खचला रस्ता
By admin | Published: September 22, 2016 2:21 AM