यवतमाळ : मुसळधार पावसामुळे कालपासून रस्ता बंद झाल्यामुळे महिलेला उचलून नेत नाल्यापलीकडच्या अॅम्बुलन्समध्येच प्रसुती करण्याची वेळ डॉक्टरांवर आली. डॉक्टरांच्या या प्रसंगावधानामुळे महिला आणि बाळ दोघेही सुखरुप आहेत.
राणीधानोरा ते लोनबेहळ हा रस्त्यावरील नाल्याला पाणी आल्याने काल पासून वाहतूक बंद होती. दरम्यान, कालपासून या गावातील एका महिलेला प्रसुती वेदना होत होत्या. मात्र, कचरा, लाकडे अडकून पुलावरून पाणी वाहत असल्याने रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला होता. यामुळे लोनबेहळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये नेणे शक्य नव्हते. रात्र जागुन काढली. सकाळीही पुलावरून पाणी वाहत असल्याने शेवटी लोनबेहळचे डॉक्टर निरंजन जाधव यांना फोनवरून कल्पना देण्यात आली. मात्र, नैसर्गिक अडथळ्यामुळे तेही काही करू शकत नव्हते.
अखेर डॉक्टरांनी अॅम्बुलन्सद्वारे नाल्यापर्यंत येण्याचा निर्णय घेतला. तसेच गर्भवती महिलेच्या नातेवाईकांनाही तिला नाल्यापर्यंत घेऊन येण्यास सांगितले. यानंतर या महिलेला चादरीमध्ये उचलून घेऊन नाला पार करण्यात आला. तोपर्यंत डॉक्टरही नाल्यापलिकडे आले होते. महिलेला घेऊन अॅम्बुलन्स प्राथमिक आरोग्य केंद्राकडे वळविण्यात आली. मात्र, वाटेत असतानाच महिलेला प्रचंड वेदना होऊ लागल्याने तिची अॅम्बुलन्समध्येच प्रसुती करण्यात आली. यानंतर तिला व बाळाला सुखरुप दवाखान्यात दाखल करण्यात आले.