ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 21- मुंबईसह राज्यभरात पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. पहिल्याच पावसात मुंबईची लाइफलाइन समजली जाणारी लोकल रेल्वे कोलमडली आहे. त्यापाठोपाठच मुंबई मेट्रोची वाहतूक मंदावली असून, मुंबई मेट्रो 25 मिनिटे उशिरानं धावत आहे. मुंबई मेट्रोच्या डी. एन. नगर स्टेशनजवळ तांत्रिक बिघाड झाल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे. त्यामुळे कामावरून घरी जाणा-या प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत.
तसेच पवईच्या रस्त्यावरही वाहतुकीचा मोठा खोळंबा झाला आहे. या जोरदार पावसाचा तिन्ही मार्गांवरील लोकलवर परिणाम झाला आहे. पश्चिम रेल्वेची वाहतूकही उशिरानं सुरू आहे. मध्य रेल्वेवर कुर्ला ते घाटकोपरदरम्यान वाहतूक धिम्या गतीनं सुरू आहे. तर हार्बर रेल्वेवरच्या नेरुळ ते बेलापूरदरम्यानची वाहतूक मंदावली आहे.
(पारसिक बोगद्याजवळील दरड हटवली, रेल्वे वाहतूक धिम्या गतीने सुरू)
लोकलच्या खोळंब्यामुळे प्रवाशांनाही मनस्ताप सहन करावा लागतो आहे. पहिल्याच पावसानं मुंबईच्या लोकलची ही दशा झाली आहे. त्यामुळे पाऊस सक्रिय झाल्यास लोकलचे तीन-तेरा वाजण्याची भीती प्रवाशांना सतावत आहे.