ऑनलाइन लोकमत -
मुंबई, दि. 20 - देशभक्त विरूद्ध देशद्रोही असा वाद उभा करुन केंद्र सरकार आपले आजवरचे अपयश झाकण्याचा प्रयत्न करीत आहे. ज्वलंत प्रश्नांवरून लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांना हेतुपुरस्सर लक्ष्य केले जात आहे असा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे. भाजप व संघाचे हे षडयंत्र आम्ही कदापीही यशस्वी होऊ देणार नाही. हे उपद्व्याप थांबले नाही तर काँग्रेस कार्यकर्ते रस्त्यावर उतरून चोख प्रत्युत्तर देतील, असा खणखणीत इशाराही त्यांनी दिला आहे. शिर्डीमध्ये पत्रकारांशी ते बोलत होते.
राहुल गांधी यांनी रोहित वेमुलाची आत्महत्या आणि दिल्लीच्या जवाहरलाल नेहरु विद्यापीठातील घटनेसंदर्भात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. पण भाजप आणि संघ परिवाराने षडयंत्र रचून त्यांच्याविरोधात अपप्रचार सुरु केला. गांधी कुटुंबाची बलिदानाची, त्यागाची परंपरा राहिली आहे. या कुटुंबाला भाजप आणि संघाकडून देशभक्तीच्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही. भाजप व संघाला देशभक्तीवर बोलण्याचा नैतिक अधिकार तरी आहे का? अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आज तिरंगा हातात घेवून मोर्चे काढत आहे. परंतू नागपुरातील संघाच्या मुख्यालयात स्वातंत्र्यानंतर किती वर्षे तिरंगा फडकविला नाही, याची माहिती अभाविपने जाणून घ्यावी, असंही ते यावेळी बोलले आहेत.
देशभक्तीच्या घोषणा देणारे भाजपवाले अफजल गुरुवरुन राजकारण करु पाहत आहेत. या अतिरेक्याला कॉंग्रेस सरकारच्या कार्यकाळातच फासावर चढविण्यात आले. पण आता त्याच अफजल गुरुला हुतात्मा संबोधणा-या पीडीपीसोबत भाजपने जम्मू-काश्मीरमध्ये युती सरकार स्थापन केले, याचे भान भाजप कार्यकर्त्यांना कसे राहिले नाही, अशीही विचारणा विखे पाटील यांनी केली आहे.