डॉ. नितीन देशपांडेकुठेही अपघात घडला की तेथे पहावयास मिळतात ते घटनास्थळावरून काढता पाय घेणारे उपस्थित अथवा केवळ बघ्यांची गर्दी. वेळीच वैद्यकीय मदत न मिळाल्याने अनेक जखमींना आपला जीव गमवावा लागतो. असे असंवेदनशील अनुभव लक्षात घेत सन २०१८ पासून महाराष्ट्र ऑर्थोपेडिक असोसिएशनचे तत्कालीन अध्यक्ष डॉ. पराग संचेती यांनी १ मे रोजी असोसिएशनच्या स्थापना दिनाचे औचित्य साधून जखमींना मदत करण्याबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या लोकोपयोगी उपक्रमाची कल्पना मांडली व राबवली. त्याचाच पुढील भाग म्हणून या वर्षी २७ एप्रिलपासून ४ मेपर्य़ंत राज्यभर पुढील उपक्रम सर्व जिल्हा शाखा व सर्व सभासद यांच्या मदतीने राबविले जात आहेत. हा उपक्रम सामाजिक संस्था, शाळा, महाविद्यालये व अन्य आस्थापनांमध्ये राबविला जाईल.
या उपक्रमाअंतर्गत अपघातग्रस्त व्यक्तीला सुयोग्य पद्धतीने मदत करण्याचे शिक्षण सर्व जनतेला दिले जाईल, तसेच त्याविषयीची भीती व नकारात्मक भूमिका बदलण्यासाठीचे प्रयत्न केले जातील. यामध्ये सर्वसामान्य जनतेशी थेट संवाद केला जाईल, माहिती दिली जाईल, प्रात्यक्षिक शिकवले जाईल. आतापर्यंतच्या पाहणीत असे आढळले आहे, की अपघातग्रस्त व्यक्तीला वेळेत मदत न मिळाल्यामुळे मृत्यू अथवा अपंगत्व येण्याचे प्रमाण खूप आहे. परदेशातील सुविधांच्या तुलनेने आपला देश खूपच मागे आहे. या बदलाची सुरुवात वरील कार्यातून केली जाणार आहे. अपघातस्थळी उपस्थित असलेल्या व्यक्तींनी अपघातग्रस्त व्यक्तीला दिलेली तत्काळ मदत ही अपघातग्रस्त व्यक्तीच्या आयुष्यात तो जगणार का मरणार, हे ठरवू शकते किंवा तो निरोगी आयुष्य जगणार की कायमचे अपंगत्व घेऊन जगणार, इतका फरक घडवू शकते.
अपघातात जखमी व्यक्तीला मदत करण्यास रस्त्यावरील व्यक्तींनी पुढे न येण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे अशा व्यक्तींना वाटणारी कोर्ट कचेऱ्यांची वा पोलिसांकडून दिल्या जाणाºया त्रासाची भीती. पण सुप्रीम कोर्टाने घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार अपघातग्रस्त व्यक्तीला मदत करण्यासाठी धावून जाणाºया व्यक्तीला (गुड समरिटान) अशी संज्ञा आहे, तर अशा गुड समरिटानला स्वत:चे नाव वा पत्ता पोलिसांना सांगणे बंधनकारक नाही. पोलीस अशा गुड समरिटानला अपघाताचा साक्षीदार बनण्याची सक्ती करू शकत नाहीत. तसेच ते त्यांचा जबाब घेण्यासाठी त्याला पोलीस ठाण्यामध्ये बोलावू शकत नाहीत.
त्यामुळे सर्वात महत्त्वाचे म्हणजे रस्त्यावर अपघात झालेला दिसताच मदतीसाठी थांबा. त्यानंतर त्वरित आपत्कालीन क्रमांकावर संपर्क साधून अपघातस्थळाचे ठिकाण, अपघाताचा प्रकार (उदा. मोटार झाडावर आदळली किंवा बाइकने सायकलस्वाराला उडवले) आणि अपघातातील अंदाजित जखमी व्यक्तींविषयी माहिती द्या. भारतात सध्या १०० (पोलीस) व १०८ (अॅम्ब्युलन्स) हे आपत्कालीन क्रमांक आहेत. पण प्रगत देशात (उदा. अमेरिका - ९११) ज्याप्रमाणे पोलीस, अॅम्ब्युलन्स, फायर बिग्रेड या सर्वांच्या नियंत्रण कक्षाकरिता एकच दूरध्वनी क्रमांक असतो. त्याप्रमाणे भारतात ११२ हा दूरध्वनी क्रमांक काही वर्षांमध्ये एकात्मिक आपत्कालीन दूरध्वनी क्रमांक म्हणून वापरण्याविषयी प्रयत्न सुरू झालेले आहेत. याखेरीज तुम्हाला जर जवळपासच्या अॅम्ब्युलन्स सेवेचा/ डॉक्टरचा क्रमांक माहिती असेल तर तेथे फोन करून कळवा, जेणेकरून अशा व्यक्तीला पुढची मदत मिळण्याचा मार्ग सुकर होईल.
फोन करून झाल्यावर अपघातस्थळी तुम्ही जाऊन मदत करण्यासाठी ती जागा सुरक्षित आहे किंवा नाही, याची खात्री करून घ्या. म्हणजे रुग्ण समजा रस्त्याच्या मध्यभागी आहे, तर अशा वेळी तुम्ही तेथे जाऊन रुग्णाला मदत करणे तुमचा जीव धोक्यात घालू शकते. तर अशा वेळी दुसºया कोणाला तरी ट्रॅफिक डायव्हर्ट (दुसरीकडे वळवायला) करायला सांगून किंवा रुग्णाला रस्त्याच्या कडेला फुटपाथवर घेऊन मगच त्याला मदत द्या. धोकादायक स्थळी मदत देऊन तुमचा जीव धोक्यात घालू नका.
सामान्य अप्रशिक्षित (वैद्यकीय किंवा नर्सिंगचे प्रशिक्षण न घेतलेली) व्यक्ती अपघातस्थळी कशा प्रकारची मदत करू शकते? १) अपघातग्रस्त व्यक्तीचा श्वास चालू आहे याची खात्री करून घ्या. श्वासातून फारच घरघर येत असेल तर अशा व्यक्तीचा खालचा जबडा (हनुवटी) हाताच्या बोटांनी उचलल्यास श्वासमार्ग मोकळा होण्यास मदत होते. तसेच घशात/तोंडात अगदी सहज दिसणारे श्वासमार्गातील अडथळे (उदा. पान-तंबाखू, कवळी) काढून टाका.बेशुद्ध व्यक्तीत जिभेचा मागचा भाग घशामध्ये पडून - अडकून श्वासमार्ग बंद पडतो व अशी व्यक्ती अपघातातील जखमांमुळे न मृत्यू पावता अशा प्रकारे श्वास बंद पडल्यामुळे मृत्यू पावते. तेव्हा वरील सांगितलेल्या क्रिया करून अशा व्यक्तीचा श्वासमार्ग आपण मोकळा करू शकता व अशा व्यक्तीची वाचण्याची शक्यता वाढवू शकता.२) अपघातग्रस्त व्यक्तीच्या शरीरातून होणारा रक्तस्राव थांबवा. कधी कधी अपघातात अतिरक्तस्राव झाल्यामुळे व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो. अपघातस्थळी रक्तस्राव थांबवण्यासाठी जखमेवर हाताने दबाव द्या अथवा जखमेभोवती घट्ट फडके/ बँडेज गुंडाळा. या दोन सोप्या कृतीने जखमेतून होणारा रक्तस्राव थांबू शकतो व रुग्णाचा जीव वाचू शकतो.३) अपघातग्रस्त व्यक्तीचे हात/पाय मोडले असतील व वेडेवाकडे झाले असतील तर त्यांना आधार द्या. अशा फ्रॅक्चर झालेल्या हाता-पायांना रुग्णाला फार न दुखावता जेवढे जमेल तेवढे सरळ करा व त्यांना सहज उपलब्ध कडक वस्तूंचा (उदा. कार्डबोर्ड/ काठ्या /छत्री) आधार द्या. यामुळे रुग्णाचे दुखणे कमी होईल व त्याच्या हाता-पायाकडे जाणारा रक्तपुरवठाही सुरळीत होईल.४) जखमी व्यक्ती जर श्वास घेत असेल, पण प्रतिसाद देत नसेल (शुद्धीवर नसेल) तरअशा व्यक्तीला एका कुशीवर झोपवा. कुशीवर झोपवल्यास अशा व्यक्तीचा श्वासमार्ग मोकळा राहतो.रस्त्यावरील अपघातात जमलेल्या गर्दीपैकी ‘बघ्या’ व्यक्तींनी नुसतेच ‘बघत’ न राहता जेव्हा आवश्यकता असेल तेव्हा या उपरोक्त ४ कृती केल्यास जखमी व्यक्तीचा जीव वाचण्याची शक्यता बरीच वाढते. या सर्व बाबींचे प्रशिक्षण देण्यासाठी महाराष्ट्र अस्थिरोगतज्ज्ञ संघटनेतर्फे ‘रस्त्यावरील अपघातात द्या माणुसकीचा हात’ या शीर्षकाचा प्रशिक्षण कार्यक्रम राबवला जाणार आहे. कोणाला हा प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यास स्वारस्य असल्यास, डॉ. प्रकाश सिगेदार, सचिव - महाराष्ट्र अस्थिरोगतज्ज्ञ संघटना - जालना यांच्याशी संपर्क साधावा.
बऱ्याच वेळा असे दिसून येते, की उपचारांच्या दरम्यान दुर्घटना घडल्यास डॉक्टरांची काहीही चूक नसताना त्यांच्यावर हल्ले होतात व अशा वेळी पोलीस व न्यायव्यवस्था सोईस्करपणे डॉक्टरांच्या विरुद्ध भूमिका घेतात. याबाबतीत पोलीस व न्यायव्यवस्थेशी संबंधित अधिकाऱ्यांना भेटून, त्यांच्याशी चर्चा करून, अधिकाºयांचे मतपरिवर्तन करून, त्यांना कायद्याप्रमाणे कारवाई करण्यास भाग पाडणे व डॉक्टरना कायद्यानुसार संरक्षण देणे यासाठी जागरूक करणे, यासाठीचे सर्व प्रयत्न करण्यात येणार आहेत. वरील दोन गोष्टींविषयीची जागरूकता सर्वसामान्य लोक, पोलीस आणि न्यायव्यवस्था यांच्यामध्ये वाढविण्याबद्दलचे सर्व ते प्रयत्न या स्थापना दिनाच्या निमित्ताने राज्यभर करण्यात येणार आहेत.(लेखक महाराष्ट्र अस्थिरोग संघटनेचे अध्यक्ष आहेत)