बारामती : बारामती शहर पोलीस ठाण्याच्या वतीने शहरामध्ये रस्ता सुरक्षा अभियान राबवले जात आहे. यासाठी शहरातील प्रमुख चौकांमध्ये फलक लावून जनजागृतीही करण्यात येत आहे. मात्र, शहरातील वाहतूक समस्या वर्षानुवर्षे ‘जैसे थे’ असल्याने हे अभियान केवळ दिखावाच ठरत आहे. दिवसेंदिवस बारामती शहरातील वाहतूक समस्या गंभीर होत आहे. वाढत्या बाजारपेठेमुळे बारामती शहरात दररोज मोठ्या प्रमाणात वाहनांची गर्दी असते. होणाऱ्या गर्दीच्या तुलनेत शहरातील रस्ते अपुरे व अरुंद ठरतात. त्यामुळे वाहतूककोंडीची समस्या बारामतीकरांच्या पाचवीलाच पुजली आहे. त्यात नगरपालिकेने लाखो रुपये खर्च करून अद्ययावत ‘सिग्नल यंत्रणा’ उभारली; परंतु सिग्नल यंत्रणा उभारल्यापासून त्याचा वापरच झाला नाही. शहरातील रस्ते अरुंद आहेत, तसेच कोणताही रस्ता ‘वन वे’ नाही. त्यामुळे सिग्नल यंत्रणा सुरू केली की, चौकातील रस्त्यांवर जाणाऱ्या आणि येणाऱ्या वाहनांची प्रचंड गर्दी होते. त्यामुळे शहरातील सिग्नल यंत्रणा कुचकामी ठरत आहे, असे एका वाहतूक नियंत्रक पोलिसाने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. या रस्ता सुरक्षा अभियानाच्या निमित्ताने शहर पोलिसांनी सुरक्षित प्रवासाचे आवाहन नागरिकांना केले आहे. शहरातील चौकाचौकांमध्ये फलक लावून याबाबत जनजागृती केली आहे. ‘लाल दिवा दिसला तर थांबलात तरच मुक्कामी सुरक्षित पोहोचाल’, हेल्मेट वापरा, वाहन चालवताना, रस्त्याने चालताना मोबाईलचा वापर टाळा, अशा अनेक सूचना या फलकांवर दिलेल्या आहेत. मात्र अभियानाच्या सुरुवातीला शहर पोलिसांनी विद्यार्थ्यांच्या मदतीने जनजागृती फेरी काढली. चौकात फलक लावले. यानंतर मात्र हे अभियान केवळ फलकांवरच राहिले आहे. बारामती शहरातील भिगवण चौक, तीन हत्ती चौक, इंदापूर चौक, गुणवडी चौक, कारभारी चौक, पेन्सिल चौक आदी भागांत वाहतूककोंडी, पार्किंगच्या समस्या कायम आहेत. तर भर बाजारपेठेतील सुभाषचंद्र बोस चौक, कचेरी रस्ता, छत्रपती शिवाजीमहाराज रस्ता (सिनेमा रोड) महावीर पथ आदी भागांत पार्किंगची समस्या गंभीर आहे. केवळ सुभाषचंद्र बोस चौकात चारचाकी वाहनांना बंदी केली आहे. तेथे बॅरिकेड्स लावले आहेत. मात्र या चौकापासून नजीक असणाऱ्या इतर अंतर्गत रस्त्यांवर चारचाकी वाहने सर्रासपणे महावीर पथ आणि कचेरी रस्त्यावर येत असतात. त्यामुळे वाहतूककोंडी तर होतेच. मात्र अरुंद रस्त्यांमुळे छोट्या मोठ्या अपघाताचे प्रसंग नेहमीच घडतात. तसेच बाजारपेठेतील मुख्य रस्त्यांवर चारचाकी वाहनांचे पार्किंग होते. तर काही महाभाग रस्त्याच्या मधेच चारचाकी उभी करतात. त्यामुळेही मोठ्याप्रमाणात वाहतूककोंडी होते. दररोज होणारी वाहतूककोंडी, अल्पवयीन दुचाकीचालक, गर्दीच्या वेळी वाहतूक नियंत्रक पोलिसांची अनुपस्थिती, शाळा महाविद्यालयांच्या परिसरात रोडरोमिओंची टगेगिरी यामुळे कायमच शहारांतर्गत वाहतूक समस्या ऐरणीवर येते. त्यामुळे रस्ता सुरक्षा अभियान केवळ दिखाव्यापुरतेच राहते आहे.(वार्ताहर)>दररोजच अपघातांचा करताहेत सामनासध्या ऊस कारखान्यांचा गळित हंगाम सुरू आहे. बारामती शहराच्या बाह्यवळण रस्त्यावरून तसेच तालुक्यातून ‘रिफ्लेक्टर’ पट्ट्यांशिवाय अवजड वाहनांतून ऊसवाहतूक होत आहे. त्यामुळे वाहनचालकांना किरकोळ अपघातांना सामोरे जावे लागत आहे. अनेक वेळा क्षमतेपेक्षा जास्त ऊस वाहनांमध्ये भरल्याने ही वाहने पंक्चर होतात. आहे त्या स्थितीतच वाहने रस्त्यावर उभी केली जातात. ‘रिफ्लेक्टर’ पट्ट्या नसल्याने रात्रीच्या वेळी इतर वाहनचालकांना अपघातास सामोरे जावे लागते. किरकोळ अपघातांसह एखादा मोठा अपघातदेखील होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याबाबत वारंवार वृत्त प्रसिद्ध झाले. साखर कारखान्यांचा गळित हंगामदेखील आता शेवटच्या टप्प्यात आला आहे. आरटीओ, ग्रामीण पोलीस यंत्रणा, कारखाना प्रशासन यांनी दखल घेतली नाही. त्यामुळे अशा अभियानामधून नागरिकांना आवाहन करण्यापेक्षा प्रशासनानेही आपला उदासीन दृष्टिकोन बदलण्याची गरज निर्माण झाली आहे.
रस्ता सुरक्षा अभियान केवळ दिखाव्यापुरतेच
By admin | Published: January 17, 2017 1:35 AM