ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 30 - मुंबईबाहेर प्रवास करण्याची तयारी करत असाल तर थोडावेळ थांबा....कारण मुंबईबाहेर जाणा-या सर्व महामार्गांवर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. जुना मुंबई-आग्रा हायवे, जुना मुंबई-पुणे हायवे, मुंबई-नाशिक हायवेवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. विशेष म्हणजे ही वाहतूक कोंडी गेल्या 12 तासांपासून सुरु असून परिस्थिती जैसे थे आहे. पावसाळ्यात विकेंड साजरा करण्याच्या निमित्ताने मुंबईकर बाहेर पडत असतात, त्यामुळे पावसाळी पिकनिकसाठी चाललेला मुंबईकर वाहतूक कोंडीतच अडकलेला आहे.
ठाण्यातून बाहेर पडणा-या सर्वच रस्त्यावर मोठी कोंडी लागली आहे. सर्व रस्ते जाम झाले असल्याने ठाण्यातून बाहेर पडणे मुश्किल झालं आहे. मुंब्रा-शीळफाटा, काल्हेर-कशेळी-कल्याण, माजीवडा नाका, माणकोली नाका या परिसरात ही वाहतूक कोंडी आहे. नियमांना फाटा देत होणा-या अवजड वाहतुकीमुळे हा वाहतुकीचा खोळंबा झाला आहे.
मुंबई-नाशिक हायवेवरही वाहतूक कोंडी आहे. तीन अवजड वाहने भररस्त्यात बंद पडल्याने रांजणोली नाक्याकडून खारेगाव टोलनाक्याकडे येणारी वाहतूक मंदावली आहे. परिणामी काल्हेर, कल्याण-भिवंडी, मुंब्रा, शिळफाट्यापर्यंत वाहतूक धिम्या गतीने सुरु आहे.
दरम्यान मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरील खोपोलीजवळ लूज बोल्डर्स काढण्याचे काम सुरू करण्यात आल्याने 15 मिनिटांचा ब्लॉक घेण्यात येत आहे. त्यामुळे मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरील वाहतुकीवर परिणाम झाला होता. पावसामुळे रस्त्यावर पडलेले खड्डेही वाहतूक कोंडीला कारणीभूत ठरत आहेत. मुंब्रा बायपास-शीळफाटा परिसरातील रस्त्यावर दोन दिवसांच्या पावसामुळे मोठे खड्डे पडले आहे. परिणामी रेतीबंदर रस्त्यावर पाणी साचल्याने जुना मुंबई-पुणे हायवे जॅम झाला आहे.
ठाण्यात येणा-या अवजड वाहनांच्याही लांबच्या लांब रांगा लागल्या आहेत. पनवेलपर्यंत ही रांग पोहोचली असल्याची माहिती आहे. त्यामुळे सात ते आठ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. याशिवाय रॅन्समवेअर हल्ल्यामुळे जेएनपीटी बंदरात कंटेनर्सची वाहतूक ठप्प आहे. त्यामुळे अनेक कंटेनर्स बाहेर अडकले आहे. त्यामुळेही वाहतूक कोंडीत भर पडली आहे.