लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : पावसाळा पूर्व कामांची महापालिका प्रशासनाकडून जोरदार तयारी केली जाते. मात्र, प्रत्यक्षात पाऊस पडल्यानंतर खरच कामे झाली का असा प्रश्न उपस्थित होतो. अशीच स्थिती पिंपरी-चिंचवड शहरातील रस्त्यांंबाबत झाली आहे. गुरुवारी झालेल्या पावसामुळे अंतर्गत रस्त्यांसह काही मुख्य रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. यामुळे रस्त्यात खड्डे की, खड्ड्यांत रस्ता असा प्रश्न शहरवासीयांना पडला आहे. रावेत : काही दिवस विश्रांती घेऊन गुरुवारपासून सुरू झालेल्या पावसामुळे रावेत, वाल्हेकरवाडी परिसरातील मुख्य रस्त्यासह अंतर्गत रस्त्यांची चाळण होण्यास सुरुवात झाली आहे. शहरासह उपनगरातील खड्डे हे इतर शहरांच्या खड्ड्यांच्या संख्येशी स्पर्धा करीत आहेत. पावसाळ्यात अशा प्रकारे खड्डे तयार झाल्यानंतर त्यामुळे अपघात होतात. त्यामुळे अनेक जण जायबंदीदेखील झाले आहेत. महापालिका खड्डे तात्पुरत्या स्वरूपात मुरूम टाकून बुजवते; परंतु एका ठिकाणचा बुजवला, की दुसऱ्या ठिकाणी खड्डे तयार होतात. वाल्हेकरवाडी, रावेत भागातील खडी निघून तेथील डांबरी मलमपट्ट्या निघून जाण्यास सुरुवात झाली आहे. येणाऱ्या दिवसांत हे खड्डे बुजवले नाही, तर सतत ये-जा करणाऱ्या वाहनांमुळे हे खड्डे मोठा आकार घेतील. त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढण्याची भीती आहे. परिसरातील विविध भागांतील रस्त्यांना खड्डे पडण्यास सुरुवात झाली आहे. नागरिकांना, वाहनचालकांना मोठ्या कसरतीने रस्त्यावरून ये-जा करावी लागत आहे. काही ठिकाणी रस्ता उंच, तर काही ठिकाणी सखल झाल्याने या भागात पावसाचे पाणी साचून राहत आहे. त्या ठिकाणी खड्ड्यांमुळे किरकोळ स्वरूपाचे अपघातही होत आहेत. विविध भागांतील रस्त्यांची दैना होण्यास सुरुवात झाली आहे. पावसामुळे रस्त्यावर खड्डे पडण्यास सुरुवात झाली असताना पालिकेने ठेकेदारांना तातडीने खड्डे बुजवण्याचे आदेश द्यावेत अन्यथा पाऊस कमी होईल म्हणून ठेकेदार वाट पाहत बसतात. दरम्यान, खड्ड्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत जाईल, असे नागरिकांचे म्हणणे आहे. थेरगावमध्ये पावसामुळे रस्त्यावर साचले तळेथेरगाव : गुरुवारी झालेल्या जोरदार पावसामुळे डांगे चौक ते काळेवाडी फाटा या मुख्य रस्त्यासह अनेक अंतर्गत रस्त्याची दुरवस्था झाली आहे. गुजरनगर येथील रिफ्लेक्शन सोसायटी समोर मोठे तळे साठल्याने रस्ताच खड्ड्यात गेल्याने प्रवाशांसह वाहनचालकांना वाहने चालविताना कसरत करावी लागत आहे. दिवसभर पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्यांची चाळण होण्यास सुरुवात झाली आहे. लहानमोठ्या खड्डयांमधील खडी बाहेर येऊन त्या जागेवर सतत वाहनांची आदळआपट सुरू असल्याने लहान खड्डयांनी मोठे रूप घेण्यास सुरुवात केली आहे. तसेच अनेक ठिकाणी चेंबर गळती सुरू झाली असल्यामुळे दुर्गंधी पसरू लागली आहे. रस्त्यावरील खड्ड्यात पावसाचे पाणी साठत असल्याने त्या खड्ड्यातून एखादे वाहनाचे चाक गेल्यास ते पाणी पादचाऱ्यांच्या अंगावर उडत आहे. थेरगाव भागातील रस्त्यांची दैना होण्यास सुरुवात झाली आहे. पालिकेने खड्डे बुजवण्यासाठी कोट्यवधी रुपयांची तरतूद केली आहे. ही कामे ठेकेदारांना वाटप करण्यात येतात; पण ऐन पावसाळ्यात रस्त्यावर खड्डे पडण्यास सुरुवात झाल्याने नागरिक नाराजी व्यक्त करत आहेत. तसेच अनेक ठिकाणी रस्ता उंच तर काही ठिकाणी सखल झाल्याने या भागात अपघात होत आहेत. त्यामुळे मोठा अपघात होण्याआधीच खड्डे डागडुजीची कामे तातडीने करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.मार्च ते मे या कालावधीत डांबरीकरण, डागडुजी केलेल्या रस्त्यांवरील खडी पावसाच्या पहिल्याच फटकाऱ्याने उडू लागल्याने या कामांविषयी नाराजी व्यक्त केली जात आहे. डांबराच्या मलमपट्टया निघून जाण्यास सुरुवात झाली आहे. हे खड्डे बुजवले नाहीत तर सततच्या ये-जा करणाऱ्या वाहनांमुळे हे खड्डे मोठा आकार घेतील. त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढण्याची भीती आहे.प्रवाशांंची रस्ता दुरुस्तीची मागणीनिगडी : पेठ क्ऱ २२ येथील निगडीकडुन रुपीनगरकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याची खड्डयांमुळे अक्षरश: चाळण झाली असून प्रवास करताना रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ता हा प्रश्न प्रवाशांना पडत आहे. काही महिन्यांपूर्वी निगडी येथील पेठ क्ऱ २२ मिलिंदनगरमधील ड्रेनिज लाइन व इतर दुरुस्तीच्या कामांसाठी रस्ता खोदण्यात आला होता. मात्र, काम झाल्यानंतर त्याची वेळेवर दुरुस्त न झाल्यामुळे या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या रस्त्याची दैना झाली असताना मात्र प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांना जीव मुठीत धरून या मार्गावरून प्रवास करावा लागत आहे. निगडीकडून मिलिंदनगर, राजनगर, बौद्धनगर, सह्योगनगर, रुपीनगर या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांना याच मार्गाने जावे लागते. मागील अनेक दिवसांपासून या रस्त्याच्या दुरुस्तीचे कामे न झाल्याने रस्ता खराब झाला आहे. रस्त्यामध्ये सर्वत्र मोठमोठे खड्डे पडले आहेत. पावसामुळे या खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने अपघातांना आमंत्रण मिळत आहे.अनेकवेळा चारचाकी वाहने व दुचाकी गाड्या या खड्डयांमध्ये आदळून नुकसान होत आहे. स्थानिक नागरिक, शाळकरी मुले, पीएमपी बस, व्यावसायिक व तसेच इतर परिसरात राहणारे हजारो जणांना या खड्डेमय रस्त्यामुळे मनस्ताप सहन करावा लागतो आहे. पावसाळ्याचे चार महिने येथे डांबरीकरण करता येत नसले तरी नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी प्रशासनाने तातडीने डागडुजी करून खड्डे बुजवावेत, अशी मागणी प्रवासी व स्थानिक रहिवाशी करत आहेत. अपघात टाळण्यासह वाहतूक सुरळीत राहण्यासाठी रस्त्यांवरील खड्डे दुरुस्त करून डांबरीकरण करावे, अशी मागणी होत आहे.
रस्त्यात खड्डे की, खड्ड्यांत रस्ता
By admin | Published: July 15, 2017 1:44 AM