ठाणे : वाहनचालकांच्या चुकांमुळे आणि रस्ते वाहतुकीसाठी सुरक्षित नसल्याने अनेक अपघात होतात. याच पार्श्वभूमीवर नवीन रस्ते तयार करताना, प्रादेशिक परिवहन विभागाच्या (आरटीओ) अधिकाऱ्यांची मदत घेतली जाईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाममंत्री व पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या २६व्या रस्ते सुरक्षा सप्ताहाला रविवारपासून सुरुवात झाली. या सप्ताहाचे उद्घाटन शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते.आरटीओच्या माध्यमातून मिळणाऱ्या महसुलापैकी काही निधी रस्ते सुरक्षितेसाठी मिळावा, यासाठी लवकरच मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. अपघातामध्ये मृत्युमुखी पडणाऱ्यांमध्ये तरुणांची संख्या सर्वाधिक आहे. असे असतानाही एड्स निर्मूलनासाठी मिळणाऱ्या अनुदानाच्या तुलनेत रस्ते सुरक्षेसाठी दिले जाणारे अनुदान खूपच कमी आहे. ही चिंतेची बाब आहे, असे मत त्यांनी मांडले. रस्ते सुरक्षा सप्ताह असे मर्यादित स्वरूप न ठेवता रस्ते सुरक्षा ही चळवळ झाली पाहिजे, असेही मत शेवटी शिंदे यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाला माजी आरटीओ अधिकारी एन.के. पाटील, ठाणे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय डोळे, हेमांगिनी पाटील आदी उपस्थित होते.
रस्त्यांसाठी आरटीओची मदत घेणार - शिंदे
By admin | Published: January 12, 2015 3:21 AM