सिकंदर अनवारे / दासगावदरवर्षी पावसाळा संपल्यानंतर मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गालगत उगवणारे गवत हे महामार्ग बांधकाम खात्याकडून साफ करण्यात येते. तसेच अरुंद महामार्ग असल्यामुळे दरवर्षी पावसाळ्यापूर्वी येथे अपघात होऊ नये यासाठी महामार्गालगतची साइडपट्टी मुरमाने भरली जाते. यंदा मात्र पावसाळ्यानंतर महामार्गाच्या साइडपट्टीची साफसफाई आणि मुरम टाकणे तर सोडाच, मात्र महाड तालुक्यातील वीर ते महाड या महामार्गादरम्यान साइडपट्टीवर असणारी माती काढून संपूर्ण पट्टीच नष्ट करण्याचे काम महामार्ग बांधकाम विभाग महाड यांच्याकडून सुरू आहेत. यामुळे महामार्गावर अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. महाड तालुक्यातील सावित्री खाडीवरील पूल बांधण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च होणार आहेत. लोणेरे ते कशेडी दरम्यान जवळपास २० ते २५ ठिकाणी महामार्ग खचला आहे. मात्र, यासाठी बांधकाम विभागाकडे दुरुस्तीसाठी पैसा नाही.मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग कोकणात जाण्याचा अतिमहत्त्वाचा मार्ग आहे. गणपती सण, शिमगा सण, शाळांच्या सुट्या, तसेच इतर सुट्यांच्या वेळी हा महामार्ग गजबजलेला असतो. दर दिवशी हजारो वाहने या मार्गावरून ये-जा करत आहेत. तीन-चार वर्षांपासून महामार्गाचे चौपदरीकरण होत आहे. पनवेल ते इंदापूर चौपदरीकरणाचे काम धिम्या गतीने सुरू आहे. दुसरा टप्पात इंदापूर ते कशेडी रस्त्याचे काम सुरू होणार असल्याची चर्चा आहे. मात्र, या विभागातील शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्याचे काम तेजीत असले, तरी या दुसऱ्या टप्प्याचे काम कधी सुरू होईल हे निश्चित नाही. अशा परिस्थितीत इंदापूर ते कशेडी महामार्गावर महामार्ग बांधकाम विभाग कोणत्याही तऱ्हेची तुटफूट झालेल्या ठिकाणी डागडुजीवर लक्षही देत नाही. इंदापूर ते पोलादपूर दरम्यान जवळपास ५० टक्के साइडपट्टीच राहिली नाही. दरवर्षी पावसाळ्यापूर्वी या साइडपट्ट्या भरण्याचे काम करण्यात येते. मात्र, हे काम निकृष्ट दर्जाच्या मुरमाने भरल्या जात असल्याने पावसाळा सुरू होताच धुपून जातात. याचा परिणाम सध्या साइडपट्ट्या राहिलेल्या नाहीत. पावसाळा जवळच येऊन ठेपला आहे. यंदा राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागामार्फत नवीनच युक्ती लढवली आहे. महामार्गावरील पाणी गटारामध्ये जाण्यासाठी जेसीबीद्वारे खोदकाम करून संपूर्ण माती काढून साइडपट्टीच काढून टाकली आहे. हे काम गेली आठवडाभरापासून वीर ते महाड दरम्यान महामार्ग बांधकाम विभाग महाड यांच्याकडून सुरू आहे. आता मधलाच रस्ता शिल्लक राहिल्यामुळे येत्या पावसाळ्यात येथे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.कोकणातील मंत्र्यांनी लक्ष घालणे गरजेचेमुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाने मंत्री अनंत गीते, रामदास कदम, भास्कर जाधव तसेच नारायण राणे हे नेहमी या मार्गाने कोकणात जात-येत असतात. मात्र, एवढ्या ठिकाणी महामार्ग खचला असून तो यांच्या कधीच नजरेसमोर आला नाही. यावर मात्र सर्व स्तरावरून आश्चर्यच व्यक्त होत आहे. पालकमंत्री प्रकाश महेता, तसेच सार्वजनिक बांधकाममंत्र्यांनी याकडे जातीने लक्ष घालावे, अशी मागणी करण्यात येत आहे. महामार्ग बांधकाम विभागाचे दुर्लक्षमहामार्ग बांधकाम विभाग महाड यांच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात ठिकठिकाणी खचला आहे. साइडपट्टी फोडण्याचा नवीन फंडा यांच्यामार्फत सुरू आहे. मात्र, यांच्या हद्दीत एवढा खचला असताना त्याची दुरुस्ती नाही. विचारणा केल्यानंतर निधी उपलब्ध नाही, असे उत्तर महाड कार्यालयाचे अधिकारी देत आहेत. नवीन महामार्गाचे काम सुरू होणार आहे. हेच गेली दोन वर्षांपासून महामार्ग बांधकाम विभाग महाड उत्तर देत आहे. नवीन महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू होणार आहे. अनेक वेळा महामार्गावर झाडे कोसळली. मात्र, ते पोलीस आणि प्रवासी यांनीच ही झाडे हटवण्याचे काम केले आहे. महामार्ग बांधकाम विभाग महाड एक वेळादेखील त्या ठिकाणी गेलेला नाही. पुढे होणाऱ्या अपघातांना बेजबाबदारपणे वागणारा महामार्ग बांधकाम विभाग महाडच जबाबदार असल्याचे नागरिकांकडून बोलले जात आहे.महामार्ग दुरुस्तीसाठी पैसा नाहीइंदापूर ते पोलादपूर या ७० कि.मी.च्या अंतरामध्ये पाले, वीर, दासगाव, वहूर, केंबुर्ली, महाड, गांधारपाले, मोहप्रे, नांगलवाडी, तसेच चांढवे जवळपास २० ते २५ ठिकाणी महामार्ग खचला आहे. गेल्या दोन वर्षांपासून कोणत्याही तऱ्हेची डागडुजी करण्यात आलेली नाही. या खचलेल्या ठिकाणी दरदिवशी छोटे-मोठे अपघात होत आहेत. मग शासन सावित्री पुलासारखी मोठ्या अपघाताची वाट पाहत आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. दरवर्षी मुंबई-गोवा महामार्गालगत साइडपट्टी भरण्यासाठी लाखो रुपये, ठेकेदाराच्या घशात जातात. ठेकेदारांकडून निकृष्ट दर्जाचे साइडपट्टी भरण्याचे काम केले जाते. पाऊस पडताच साइडपट्टी धुपते. सध्या माणगाव ते वीर अशा २५ कि.मी. अंतरापर्यंत धूप होऊन ठिकठिकाणी साइडपट्टीच राहिलेली नाही. यामुळे पुढे मोठ्या प्रमाणात अपघातांना धोका निर्माण झाला आहे.इंदापूर ते पोलादपूर मोठ्या प्रमाणात अपघात मुंबई ते गोवा या ६०० कि.मी. अंतराच्या अपघातासंदर्भात माहिती पाहिली, तर गेल्या दोन वर्षांच्या आकडेवारीमध्ये इंदापूर ते पोलादपूर या दरम्यानच्या महामार्गावर मोठ्या प्रमाणात अपघात झाले आहेत. २०१५मध्ये १७८ अपघात ४०९ प्रवासी जखमी, तर १६ मृत्यू झाले. २०१६मध्ये १४१ अपघात झाले असून, २०६ जखमी तर २२ मृत्यू. दोन वर्षांच्या आकडेवारीमध्ये ३१९ अपघात, ६१५ प्रवासी जखमी, तर ३८ जणांचा मृत्यू झाला. या सर्वात दोन वर्षांचा मोठा अपघाताचा आकडा याच विभागाचा आहे. मात्र, या मृत्यूसंख्येमध्ये तसेच अपघातामध्ये सावित्री पूल दुर्घटना नाही. साइडपट्टी उंच होती, येत्या पावसाळ्यात रस्त्यावर पाणी साठू नये यासाठी साइडपट्टीला उतार देण्याचे काम सुरू आहे. टोळ ते महाडपर्यंत उतार देण्याचे काम झाले आहे. वीर ते कशेडी महामार्गा बांधकाम विभाग महाडची हद्द आहे. काही दिवसांतच या हद्दीमधील साइडपट्टीला उतार देण्याचे काम पूर्ण होईल. मुरमाने साइडपट्टी भरण्याचे नवीन काम नाही.- प्रकाश गायकवाड, उपअभियंता, राष्ट्रीय महामार्ग विभाग महाड
रस्ते दुरु स्तीचा साइडपट्ट्यांना फटका
By admin | Published: April 10, 2017 6:10 AM