राहुल तांबोळी ल्ल भुर्इंज ओझर्डे, ता. वाई येथील स्फोटात भाजलेल्या दोन चिमुरड्या आता शासकीय वैद्यकीय यंत्रणेत होरपळून निघत आहेत. गेली आठ दिवस मृत्यूशी झुंज देणाऱ्या या चिमुरड्यांना आता भुर्इंज येथे झोपडीत आणले आहे. केवळ अज्ञान आणि गरिबी यामुळे पाच वर्षांची गीता आणि नऊ वर्षांची पूजा उपचाराअभावी इवल्याशा झोपडीत तडफडत आहेत. ओझर्डे येथील यात्रेत शोभेच्या दारूच्या साठ्याचा स्फोट झाला होता. या स्फोटात पूजा रामदास पवार आणि गीता रामदास पवार जखमी झाल्या होत्या. त्यांची आज आठ दिवसानंतरही सुरू असणारी होरपळ अंगावर शहारे आणणारी अशीच आहे. घटनेनंतर त्या दोघींना सातारा येथील दिवंगत क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. दुसऱ्याच दिवशी तेथील डॉक्टरांनी या दोघींना पुण्याला न्या, असे सांगितले. पूजा व गीता या अत्यंत गरीब अशा गोपाळ समाजातील आहेत. या दोघींचा सांभाळ आजी करते. जत्रेत किरकोळ वस्तू विकून जगणे, हे त्यांच्या उपजीविकेचे साधन आहे. त्यामुळे पुण्याला उपचारासाठी नेणे त्यांना शक्य नसल्याचे नातेवाइकांनी सांगितले. त्यांवर तरडगाव, ता. फलटण येथील नातेवाइकांनी त्या दोघींना आपल्या गावी नेले. तेथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. तेथे काही दिवस ठेवण्यात आले. तेथून पुन्हा सातारला न्या, असे सांगण्यात आले. त्यामुळे पुन्हा साताऱ्यात आणल्यावर पुण्याला न्या, असे सांगण्यात आले. अशिक्षित आणि गरीब अशा गोपाळ समाजातील पूजा व गीताच्या नातेवाइकांनी अखेर दोघींना भुर्इंज येथील झोपडीत आणले आहे. दोघींनाही उपचाराविना घरी ठेवले आहे. म्हणजे त्यांच्या मृत्यूची वाट पाहण्यासारखेच आहे. कारण गीता ८० टक्के तर पूजा ६८ टक्के भाजून जखमी झाली आहे. ही टक्केवारी अतिशय गंभीर आहे. पाणीपणी करीत झोपडीत तडफडत असणाऱ्या या चिमुरड्या पाहून प्रत्येकाचं काळीत पिळवटून निघत आहे. चौकशीचे औदार्यही नाही... पूजा व गीताचा सांभाळ आजी करते. ओझर्डेतील स्फोटात आजीचे खेळण्याचे दुकान जळून खाक झाले आहे. घटनेवेळी या दोघी दुकानाच्या पालातच झोपल्या होत्या. प्रचंड दुर्लक्ष, नियोजनाचा अभाव आणि दारूकाम करणाऱ्याचा हलगर्जीपणा पूजा व गीताच्या जीवावर बेतला आहे. घटनेनंतर जखमी गीता व पूजा कशा आहेत. याची चौकशी करण्याचे औदार्यही कुणी दाखविलेले नाही. गरिबांचे जीव संबंधितांसह सर्वच यंत्रणेला एवढे स्वस्त झाले आहेत की काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
भाजलेल्या चिमुरड्यांची गरिबीपायी होरपळ!
By admin | Published: April 16, 2015 11:22 PM