ऑनलाइन लोकमतनागपूर, दि. 7 : ज्या दिवशी दारूबंदी आहे, त्याच्या एक दिवसापूर्वी बारमध्ये शिरून दारूच्या बाटल्या चोरायच्या आणि दुसऱ्या दिवशी त्याची विक्री करायची, अशी अफलातून पद्धत अवलंबविणाऱ्या मद्यचोरांच्या एका टोळीला प्रतापनगर पोलिसांनी अटक केली. मो. सारुन मो. कुबान (वय १९), संघर्ष नतेलाल गणवीर (वय २३), स्वप्निल रवी गजभिये ( वय २३, तिघेही रा. सुभाषनगर, नागपूर) आणि नीतेश रमेश भुते (वय १९, रा. कन्हान) अशी या टोळीतील चोरट्यांची नावे आहेत.
दारूबंदीच्या एक दिवसापूर्वी हे चोरटे पहाटेच्या वेळी एखाद्या बारमध्ये शिरत होते. तेथे मद्य प्राशन केल्यानंतर तेथून विदेशी दारूच्या बाटल्या चोरून घरी नेत होते. दुसऱ्या दिवशी ही दारू ते दामदुप्पट भावाने विकायचे. प्रतापनगर पोलिसांना त्याची कुणकुण लागल्यानंतर सारुन आणि संघर्ष या दोघांना त्यांनी ४५ हजारांच्या दारूच्या बााटल्यांसह अटक केली. त्यांची चौकशी केली असता, त्यांनी त्यांच्यासोबत चोरी करणाऱ्या स्वप्निल आणि नीतेशचे नाव सांगितले. त्यामुळे या दोघांनाही अटक करण्यात आली.
पोलीस उपायुक्त दीपाली मासिरकर, सहा. पोलीस आयुक्त आश्विनी पाटील, प्रतापनगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड, द्वितीय निरीक्षक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक एस.एस. शिर्के, उपनिरीक्षक ए. एस. स्थूल, हवालदार शंकर कोडापे, नायक खेमराज पाटील, शिपाई सतीश येसनकर, आनंद यादव, अतुल तलमले, उदय त्रिपाठी, स्वप्निल करंडे, संदीप यादव यांनी ही कामगिरी बजावली.