मुंबई : केंद्र सरकारनं पेट्रोल, डिझेलवरील उत्पादन शुल्कात वाढ केली आहे. त्यामुळे इंधनाचे दर वाढणार आहेत. पेट्रोल, डिझेलवरील उत्पादन शुल्क ३ रुपयांनी वाढवण्यात आलं आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला फटका बसणार आहे. यावरूनच काँग्रेसचे नेते तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केंद्रसरकारवर निशाणा साधला आहे.
थोरात यांनी ट्वीट करत म्हंटलं आहे की, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती ३०% नी कमी झाल्या असताना, देशात किंमती कमी करून सामान्यांना त्याचा लाभ देण्याऐवजी मोदी सरकारने पेट्रोल, डिझेलवरील उत्पादन शुल्कात प्रति लि. ३ रू. वाढ करून सर्वसामान्यांचा खिसा कापण्याचा उद्योग सुरु केला आहे. त्यामुळे हे सुटबुटातील लुटारू सरकार असल्याची टीका थोरातांनी केली आहे.
पेट्रोल, डिझेलच्या दरात आंतरराष्ट्रीय बाजारात सातत्यानं घसरण सुरू असताना मोदी सरकारनं इंधनावरील उत्पादन शुल्क ३ रुपयांनी वाढवलं आहे. यामुळे सरकारला सामान्य जनतेचा रोष सहन करावा लागू शकतो. ही परिस्थिती टाळण्यासाठी सरकार पेट्रोल, डिझेलच्या दरात थेट ३ रुपयांची वाढ करण्याची शक्यता धूसर असल्याचं क्षेत्रातल्या तज्ज्ञांकडून सांगण्यात आले आहे.