बीड – जिल्ह्यातील पोलीस दलात गेल्या अनेक वर्षापासून कार्यरत असणाऱ्या रॉकी नावाच्या श्वानाचे शनिवारी दिर्घ आजाराने निधन झाले. त्याच्या निधनामुळे पोलीस दलातील जवानांना अतिशय दु:ख झाले. स्वत: गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही रॉकीच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करत त्याला भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे. रॉकीवर आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
याबाबत गृहमंत्री अनिल देशमुखांनी ट्विट करत म्हटलं आहे की, आमच्या बीड पोलीस दलातील रॉकी नामक श्वानाचे शनिवारी दीर्घ आजाराने दुःखद निधन झाले. त्याच्या आत्म्यास चिरशांती लाभो अशी मी ईश्वराजवळ प्रार्थना करतो. भावपूर्ण श्रद्धांजली!
रॉकीने आजपर्यंत ३६५ गुन्हे उघडकीस आणण्यात मोलाची भूमिका बजावली होती. बीड पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारा एक प्रामाणिक योद्धा आम्ही रॉकीच्या जाण्याने गमावला आहे. त्यांच्या निधनाचे वृत्त मन हेलावून टाकणारे आहे. रॉकीने केलेली कामगिरी माझ्यासह बीड पोलीस दलाच्या मनात सदैव घर करून राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
दहशतवादी हल्ले, बॉम्बशोधक, बॉम्बनाशक पथके, गुन्ह्यांची उकल आणि सभा बंदोबस्त इ. विषयांच्या संदर्भात महाराष्ट्र पोलीस दलातील श्वानपथक महत्वाची भूमिका बजावत असते. महाराष्ट्र पोलीस दलातील तंत्रशुद्ध प्रशिक्षणाने तयार झालेले श्वान हजारो नागरिकांचे जीवन वाचविण्याचे काम करत आले आहेत. गुन्हा घडताच तात्काळ हजर होऊन आरोपींचा मागोवा काढत तपास करण्यात श्वानांचा मोठा हातभार आहे. विशेष म्हणजे गुन्हे शोधण्यात बीडच्या श्वानांनी अव्वल स्थानही पटकावलेले होते. यामुळे बीड पोलिसांची मानही उंचावली होती. अगदी स्त्रीभ्रूण हत्येपासून ते खुनाच्या अरोपी, काळेगावचे रेडिओ स्फोटापर्यंतच्या गुन्ह्यात श्वानांची भूमिका अग्रस्थानी राहिलेली होती.
बीड जिल्हा पोलीस दलात डॉन, रॉकी, मार्शल, चॅम्प, जॉनी, बोल्ट अशी सहा श्वान कार्यरत होते. यातील रॉकी, डॉन आणि जॉनी हे तीनही श्वान अनुभवी आहेत. त्यातील रॉकीचं शनिवारी निधन झालं. उस्मानाबाद जिल्ह्यात पतीने चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीच्या प्रियकराचा काटा काढला होता. यामध्ये घटनास्थळी कसलाही पुरावा नव्हता. मात्र रॉकी या अनुभवी श्वानाने अधिकाऱ्यांना आरोपीच्या घरापर्यंत पोहचविले होते. त्यामुळे उस्मानाबाद पोलिसांना या खूनाचा तपास करण्यात यश आले होते. तसेच ज्या प्रकरणामुळे बीड जिल्हा बदनाम झाला त्या स्त्रीभ्रूण हत्या प्रकरणात अर्भक टाकलेल्या ठिकाणी श्वानानींच पोहोचविले होते. या प्रकरणात श्वानांची भूमिका खुप महत्वपूर्ण राहिली होती. चोरी, दरोडा, खून यासह व्हीआयपी बंदोबस्त, सार्वजनिक ठिकाणे, मर्मस्थळांची तपासणीही या श्वानांमार्फत केली जाते. त्यामुळे बीड जिल्ह्यात गैरप्रकार घडला नाही. हे टाळण्यात श्वानांची भूमिका महत्वाची राहिली आहे.