Rohini Khadse vs Chitra Wagh, Supriya Sule: महाराष्ट्र सरकारने मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना हाती घेतली असून गरीब कुटुंबातील मुलींना लखपती करण्याचा निर्णय झाला आहे. मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात हा निर्णय घेण्यात आला. या योजनेंतर्गत पिवळ्या व केशरी रेशनकार्डधारक कुटुंबात मुलीचा जन्म झाल्यावर पाच हजार रुपये, इयत्ता पहिलीत गेल्यावर सहा हजार, सहावीत गेल्यावर सात हजार रुपये, ११ वीत गेल्यावर आठ हजार रुपये, १८ वर्षे पूर्ण झाल्यावर ७५ हजार रुपये अशा रीतीने त्या मुलीस एकूण एक लाख एकहजार रुपये एवढा लाभ मिळणार आहे. या योजनेवरून बोलताना काल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारवर टीका केली. त्यांच्या टीकेला भाजपा महिला नेत्या चित्रा वाघ यांनी उत्तर दिले. मात्र आता या वादात राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांनी उडी घेतली आहे.
चित्रा वाघ यांनी सुप्रिया सुळेंवर टीका केल्यानंतर, त्याला उत्तर देताना रोहिणी खडसेंनी चित्राताईंवर प्रश्नांची सरबत्ती केली. "अहो चित्राताई, भारतीय जनता पक्षात महिलांना मान सन्मान दिला जातो हे तुम्हाला कुणी सांगीतलं बरं? आम्ही अनेक वर्षे तिथे होतो, आम्हाला महित आहे काय आहे ते..... बरं ठिक, तुमचे म्हणणे बरोबर आहे, असे म्हटले तर मग, आदरणीय पंकजाताईवर अन्याय कशासाठी सुरु आहे हो? जरा विचारा ना तुमच्या नेत्यांना...", असा महत्त्वाचा सवाल त्यांनी केला.
पुढे ट्विटमध्ये त्या म्हणाल्या, "केवळ त्याच नाही तर ज्यांनी पक्ष वाढविला, तळागाळात पोहचविला त्या स्व. प्रमोदजी महाजन यांच्या कन्या खा. पुनमताई महाजन सध्या कुठेच दिसत नाहीत हो... आणि पुण्यातल्या मा. मेधाताई कुळकर्णींचे काय? त्यांची जागा मा. चंद्रकांतदादांनी हिसकावली, नंतर त्यांच्या हातावर अक्षदा देण्यात आल्या हा त्यांचेवर अन्याय नाही का? बरं राज्यापुरतेच हे मार्यादित नाही बरं का, चित्रताई... अगदी दिल्लीत देखील दिवंगत नेत्या सुषमा स्वराज यांचेवरही अन्यायच झाला आहे. तुम्हाला माहितीच घ्यायची ना? तर मा. वसंधुराराजेंना विचारा अन्याय काय असतो ते.. अगदीच झालं तर आदरणीय सुमित्राताई महाजन यांनाही विचारा की पक्षात अन्याय कसा असतो ते.... राहीले राष्ट्रवादी काँग्रेसचे, तर इथे जर महिलांवर अन्याय होत असता तर ‘तुम्हाला राज्याचे प्रमुख पद तरी दिले असते का हो?" तसेच, उगाच टिका करायची म्हणून काहीही करु नका ताई. अशानं हसे होते बरं का... असा खोचक टोलाही त्यांनी लगावला.
चित्रा वाघ काय म्हणाल्या होत्या?
"ओ ऽऽऽऽ मोठ्ठया ताई… (सुप्रिया सुळे), कुठल्याही चांगल्या योजनेला विरोध करणं हे तुमचे कर्तव्यचं आहे ना जणू …? राज्यातील आमच्या भगिनी तुमच्यासारख्या एकरी १०० कोटींची वांगी नाही ना पिकवू शकत ताई… नविन जन्माला येणाऱ्या मुलीला १लाख १ हजार रूपये मिळणार आहेत तर तुमच्या का पोटात दुखतयं? ती लखपती होत असेल तर तुमच्या करोडपतीपणावर थोडीचं कुणी आघात करतयं ? राहिला प्रश्न आमच्या पक्षातील महिलांचा तर तर भाजपा इतकी चांगली वागणूक अन्य पक्षात नाहीचं…. आजच तुमच्या कार्यक्रमात महिलांनी गोंधळ का घातला? त्यांनी तुमच्याच पक्षात डावललं जात असल्याची भावना का व्यक्त केली याचं चिंतन करा मोठ्ठया ताई… आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं पहायचं वाकून …ही तऱ्हा जुनी झाली… ताई, अब पब्लीक सब जानती है … बरं का मोठ्ठ्या ताई," असे ट्विट चित्रा वाघ यांनी केले होते.