Rohini Khadse slams Naresh Mhaske: काश्मीरमधील मिनी स्वित्झर्लंड अशी ओळख असलेल्या पहलगाम येथे मंगळवारी दहशतवादी हल्ला ( Pahalgam Terror Attack ) झाला. या हल्ल्यात २६ निष्पाप हिंदू भारतीयांची हत्या करण्यात आली. यात ६ महाराष्ट्रातील लोकांचाही समावेश होता. तसेच, या घटनेनंतर महाराष्ट्रातील अनेक पर्यटक जम्मू काश्मीरमध्ये अडकले होते. त्यांना महाराष्ट्रात परत आणण्याकरता महाराष्ट्र सरकारकडून प्रयत्न करण्यात आले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) स्वत: श्रीनगरला गेले आणि त्यांनी एका अतिरिक्त विमानातून महाराष्ट्रातील अनेक पर्यटकांना सुखरूप परत आणले. याबाबत माहिती देताना, शिंदेसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी केलेल्या विधानामुळे वाद निर्माण झाला. त्यावर शरद पवार गटाच्या रोहिणी खडसे यांनी सडेतोड उत्तर दिले आहे.
नरेश म्हस्के काय म्हणाले होते?
माध्यमांना माहिती देत असताना म्हस्के म्हणाले होते की, "काश्मीरमधून महाराष्ट्रात परतणाऱ्या लोकांपैकी काही लोक तिथे रेल्वेने गेले होते. सीरआरपीएफच्या कॅम्पमध्ये राहत होते, ते आयुष्यात कधीही विमानात बसले नव्हते. त्या लोकांना विमानाने आणण्याची व्यवस्था एकनाथ शिंदे यांनी केली. एकनाथ शिंदे तिथे गेल्याने अधिकाऱ्यांना प्रोत्साहन मिळाले, काम करण्याची स्फूर्ती वाढली. एक जबाबदार माणूस गेला तर तुम्ही त्याला कुरघोडी आणि श्रेयवाद म्हणता. ४५ लोक रेल्वेने गेले होते, पहलगाममध्ये अडकले, सीआरपीएफच्या कॅम्पमध्ये राहिले. त्यांच्या खाण्याचे वांदे होते. त्या लोकांना एकनाथ शिंदेंनी विमानतळावर आणलं, ते लोक पहिल्यांदा विमानात बसले." म्हस्के यांच्या या विधानाने वाद निर्माण झाला असून, त्यांच्यावर टीका केली जात आहे.
रोहिणी खडसेंचा घणाघात
"दहशतवादी हल्ल्यासारख्या गंभीर विषयात महाराष्ट्रात दुर्दैवाने श्रेयवादाची लढाई सुरू आहे. सध्याची वेळ ही सगळ्यांनी एकत्र येऊन या परिस्थितीला सामोरे जाण्याची आहे. पण खासदार नरेश म्हस्के यांनी केलेल्या वक्तव्याचा आम्ही निषेध करतो. ही उपकाराची भाषा महाराष्ट्रातली जनता खपवून घेणार नाही. एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्री पदावर बसवून महाराष्ट्रातील जनतेने उपकार केले आहेत. त्यामुळे अशा वक्तव्याने जनता तुम्हाला खुर्ची सोडायला भाग पाडेल हे विसरू नका. ज्या विमानातून तुम्ही लोकांना आणलेत, ती विमानसेवा लोकांच्या टॅक्समधून दिली जात आहे. त्याचे पैसे तुम्ही तुमच्या घरून भरलेले नाहीत. त्यामुळे उपकाराची भाषा करू नका," अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी म्हस्के यांच्यावर टीकास्त्र सोडले.