मुंबई – आज आर आर आबांच्या विचारांचा वारसदार म्हणून आम्ही शरद पवारांच्यासोबत राहण्याची भूमिका घेतली आहे. सांगली जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी इथं आलेत. तासगाव कवठेमहांकाळमधील लोक इथं आलेत. सर्वांसमोर वचन देतो की, एक तरूण म्हणून प्रसंगी महाराष्ट्र पिंजून काढायची वेळ आली तर पिंजून काढू. राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहचू. सर्वसामान्यांची अडचण समजून घेऊ. येणाऱ्या काळात शरद पवारांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक नंबरचा पक्ष बनवल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही असं खणखणीत भाषण रोहित पाटील यांनी यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये बैठकीत केले.
राष्ट्रवादी काँग्रेसची शरद पवारांच्या नेतृत्वात वायबी सेंटर इथं बैठक आयोजित केली आहे. तिथे रोहित पाटील बोलत होते. रोहित पाटील म्हणाले की, स्व. आर.आर आबा फारतर जिल्हा परिषदेपर्यंत मजल मारू शकणारे नेतृत्व होते. पण शरद पवारांनी विधानसभेची संधी दिली. विरोधी पक्षनेते म्हणून आबांनी महाराष्ट्रात छाप पाडली. १९९९ मध्ये शरद पवारांसोबत राष्ट्रवादीत आले. पवारांच्या विचारांसोबत राहण्याची भूमिका घेतली. महाराष्ट्रातील सर्वसामान्य घरातील मुलाला महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री, गृहमंत्रिपदावर बसवण्याची दानत शरद पवारांमध्ये आहे हे लक्षात घेण्याची आवश्यकता आहे असं त्यांनी म्हटलं.
तसेच गेल्या २३-२३ वर्षात अनेक क्रांतिकारक निर्णय घेतले गेले. राष्ट्रवादी पक्षाची धोरणे आखली गेली. ज्याचा फायदा राज्यातील सर्वसामान्य जनतेला झाला. शाहू-फुले-आंबेडकरांची विचारधारा पुढे नेताना इथल्या माताभगिनींना आरक्षण देण्याचा निर्णय पवारांनी घेतला. जैन, मुस्लीम समाजाला अल्पसंख्याकाचा दर्जा, धनगर, मराठा समाजाला न्याय देण्याची भूमिका घेतली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची दखल घेतली जावी म्हणून मराठवाडा विद्यापीठाला नामांतराला विरोध होत असतानाही शरद पवारांनी तो धाडसी निर्णय महाराष्ट्रात घेण्याचे काम केले असंही रोहित पाटील म्हणाले.
दरम्यान, ८३ वर्षाचा तरूण म्हणून शरद पवारांना संबोधतो. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानात भाषण करण्याचा माझा पहिला प्रसंग आहे. आजचं व्यासपीठ कायमस्वरुपी लक्षात राहण्यासारखे आहे. अनेक वक्त्यांसमोर भाषण केली. आबा प्रदेशाध्यक्ष असताना अनेक आव्हानांना तोंड देत राष्ट्रवादीच्या जास्तीत जास्त आमदारांना निवडून आणण्याचे काम आबांनी केले. आज तोच आबांचा वारसदार म्हणून निश्चितपणाने शरद पवारांसोबत पक्षाच्या जास्तीत जास्त जागा कशा निवडून येतील यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. सर्वसामान्य माणूस राष्ट्रवादीची ताकद आहे. फक्त उपस्थित राहून पाठिंबा देण्याऐवजी साहेबांच्या विचारांशी खूणगाठ बांधूया. येणाऱ्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता राज्यात आणून दाखवूया. सगळी जबाबदारी शरद पवारांवर टाकून उपयोग नाही. आज प्रसंग बाका आहे. मावळ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य घडवण्यासाठी वाटेल ते करण्याची भूमिका घेतली तशीच भूमिका आपल्या तरूणांना घ्यावी लागेल. शरद पवारांचे स्वप्न पूर्ण करून दाखवावे लागतील. असं आवाहन रोहित पाटील यांनी कार्यकर्त्यांना केले.