Maharashtra Politics: राज्यात विविध मुद्द्यांवरून राजकीय वातावरण तापताना दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून भाजप नेते आणि आमदार गोपीचंद पडळकर हे सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासह पवार कुटुंबियांवर टीका करताना दिसत आहेत. अलीकडेच पडळकर यांनी केलेल्या टीकेचा राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते रोहित पाटील यांनी खरपूस शब्दांत समाचार घेतला आहे. शरद पवारांचे विचार आणि राष्ट्रवादी काँग्रेस कुणीही संपवू शकत नाही, असे रोहित पाटील यांनी नमूद केले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयावर भाजपचा झेंडा लागला आहे. भाजपचा हा झेंडा येत्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या घरावरही लागलेला दिसेल, असे मी तुम्हाला विश्वासाने सांगतो. आता आपल्याला भाजपमध्येच जावे लागेल, असे ९० टक्के कार्यकर्ते म्हणतील आणि मग मुंबईच्या कार्यालयावर नेमका कोणाचा झेंडा लागेल असा त्यांच्यात वाद निर्माण होईल. ९० टक्के राष्ट्रवादी ही भाजपात विसर्जित होईल. तर बहुमताने लोक भारतीय जनता पक्षात येतील, असा मोठा दावा गोपीचंद पडळकर यांनी अलीकडेच केला होता. याला रोहित पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
शरद पवारांचे विचार आणि राष्ट्रवादी काँग्रेस कुणीही संपवू शकत नाही
असा कोणताही पक्ष आणि संघटना संपत नसते आणि आपला जन्मच राष्ट्रवादीच्या स्थापनेबरोबर झाला आहे. त्यामुळे आपण तरी राष्ट्रवादीशिवाय अन्यत्र कुठेही जाऊ शकत नाही. महाराष्ट्राच्या नवनिर्मितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा आणि शरद पवारांचा मोठा हात आहे. नवनिर्मिती करणाऱ्या शरद पवारांबद्दल संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. महाराष्ट्राचा विकास कोणी केला याची कल्पना सर्वांनाच आहे. शेतकऱ्यांनाही याची कल्पना आहे. पवार साहेबांचे विचार आणि पक्ष कोणीच संपवू शकत नाही. त्यामुळे असा पक्ष संपणार नाही, असे रोहित पाटील यांनी ठणकावून सांगितले.
दरम्यान, नगरसेवकावर दबाव टाकला हे योग्य नाही. एवढी ताकद लावून निवडणूक चिठ्ठीवर जोरावर जात असेल तर पराभव आमचा की त्यांचा हे तपासावे लागेल. दबाव टाकून निवडणुका जिंकणाऱ्यांना लोकं थारा देणार नाहीत. मात्र मत पेटीतून लोकं उत्तर देतील.कवठमहांकाळमध्ये चिठ्ठी सरकार आहे. राजकीय पार्श्वभूमी नसणारे लोक निवडून आले. लोकांनी संधी दिली. पैशाचे आमिषामुळे सर्व बदलले, असेही रोहित पाटील म्हणाले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"