Rohit Pawar News: लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात आता आगामी विधानसभा निवडणुकीबाबत सर्वपक्षीय नेत्यांनी तयारी सुरू केल्याचे चित्र आहे. यातच राज्याच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे. लोकसभा निवडणुकीत बाजी मारल्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांचा आत्मविश्वास दुपटीने वाढला असून, महायुती सरकारला अधिवेशनात घेरण्यासाठी विरोधक प्रयत्नशील आहेत. आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. यातच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी महायुतीत अजित पवार गटाला आगामी लोकसभा निवडणुकीत किती जागा लढण्यास मिळतील, याबाबत प्रतिक्रिया देताना खोचक टोला लगावला आहे.
महायुती असेल किंवा महाविकास आघाडी असेल, त्यातील घटक पक्ष १०० जागांवर लढण्यासाठी इच्छूक आहे. मात्र, प्रत्येकाला जर १०० जागा हव्या असतील तर स्वबळावरच लढावे लागेल. विधानसभेत सन्मानजनक जागा न मिळाल्यास अजित पवार गटाची स्वबळावर लढण्याची तयारी असल्याचे अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरी यांनी म्हटले होते. यानंतर आता रोहित पवार यांनी खोचक शब्दांत भाष्य केले आहे.
विधानसभेला महायुतीत अजितदादांच्या वाट्याला २० ते २२ जागा येतील
विधानसभा निवडणुकीत भाजपा २०० जागांवर लढेल. त्यांनतर ज्या ८८ जागा असतील त्यामध्ये शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट असेल किंवा अजून छोटे इतर पक्ष असतील. अजित पवार गटाला २० ते २२ जागा मिळतील, अशी चर्चा आहे. शिवसेना शिंदे गटाला ३० ते ३५ जागांच्या आसपास जागा मिळू शकतात. इतर मित्रपक्षांना काही जागा मिळतील. मात्र, काही झाले, कोणी कितीही डोकेफोड केली तरी भाजपा २०० जागांच्या खाली लढणार नाही, असा मोठा दावा रोहित पवार यांनी केला.
दरम्यान, निलेश लंकेंनी खासदारकीची शपथ इंग्रजीमधून घेतली. आता नगरचे जे माजी खासदार आहेत, त्यांना एक प्रकारे उत्तर दिलं आहे. अशा पद्धतीने भाषेवर किंवा बोलण्याच्या पद्धतीवर तसेच शिक्षणावर कोणी कोणाला हिणवता कामा नये. निलेश लंके यांनी कोरोनाच्या काळात चांगले काम केले. लोकांनी त्यांना खासदार केले. त्यांना निवडून देताना लोकांनी सामान्य व्यक्ती म्हणून पाहिले. निलेश लंकेंनी दिल्लीत जाऊन इंग्रजीमधून शपथ घेतली. ते आता उद्या जाऊन मराठीत बोलतील, असे रोहित पवार म्हणाले.