मुंबई: विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी काल विधानसभेत तब्बल सव्वाशे तासांचे केलेले स्टिंग ऑपरेशन 29 वेगवेगळ्या पेनड्राइव्हमध्ये भरुन सादर केले. यादरम्यान त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर विविध आरोप केले. फडणवीस बोलत होते तेव्हा विधानसभेचे सर्व सदस्य चिडीचूप दिसले. दरम्यान, त्यांच्या या भाषणावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार (Rohit Pawar) यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.
'फॉरेन्सिक ऑडीट होण्याची गरज'विधानभवनाच्य आवारात माध्यमाशी संवाद साधताना रोहित पवार म्हणाले, "काल विरोधी पक्षनेत्याने सादर केलेले भाषण प्रभावी होते. त्यांनी कादपद्र, पेनड्राइव्ह सादर केले. आमची अपेक्षा होती की, फडणवीसांनी अध्यक्षांना पेनड्राइव्ह दिल्यानंतर त्याचे फॉरेन्सिक ऑडीट होण्याची संधी दिली जावी. पण, लगेच हा व्हिडिओ मीडियाकडे गेला. यावरुन राजकारण केले जात असल्याचा संशय आमच्या मनात आला. त्यामुळे फॉरेन्सिक ऑडीट होईपर्यंत कुठल्याही निष्कर्षावर जाण्याची घाई करू नये,'' असे रोहित पवार म्हणाले.
'हेरगिरीसाठी तंत्रज्ञानाचा वापर'''आजकाल कुणीही तंत्रज्ञानाच्या माध्यमातून फोन हॅक करू शकतो. इस्राइलच्या पेगासस सॉफ्टवेअरच्या माध्यमातून अशाप्रकारचे हेरगिरी केली जाऊ शकते. भारतातही अशाप्रकारच्या घटना घडल्या. लोकसभेतही तो मुद्दा उपस्थित झाला होता. आता अशाचप्रकारे AI Video तंत्रज्ञानाचाही वापर केला जात आहे. यात एकाचा चेहरा दुसऱ्याला लावला जातो. या प्रकरणात त्याचा वापर झाला आहे का नाही, त्याबद्दल मला माहिती नाही. पण, जर पेगासस भारतात येऊ शकतो, तर अशाप्रकारचे सॉफ्टवेअर असूच शकतात,''अशी शंका रोहित पवारांनी यावेळी उपस्थित केली.
'आज गृहमंत्री बोलतील'''सामान्य नागरिकांचे प्रश्न विधानसभेत मांडण्याची गरज, पण आज ते होताना दिसत नाही. सत्ताधारी असो वा विरोधक, दोन्ही बाजुच्या नेत्यांनी सामान्य जनतेचे प्रश्न मांडायला हवेत. विशेष म्हणजे, भाजप कॉपी करण्यात माहिर आहे. चायनाचा एक विमानतळ, बंगालचा एक पुल उत्तर प्रदेशात दाखवला. त्यामुळे तंत्रज्ञानाच्या बाबतीत भाजप खूप पुढे आहे. माझे एकच म्हणणे आहे, फॉरेन्सिक ऑडीट होईपर्यंत कुठल्याही निष्कर्षावर जाऊ नये. यावर आज गृहमंत्री दिलीप वळसे पाटील बोलतील,''असेही ते म्हणाले.