रोहित पवार, धीरज देशमुख मिनी मंत्रालयातून थेट विधानसभेच्या रणांगणात !
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2019 05:54 PM2019-10-03T17:54:59+5:302019-10-03T17:58:05+5:30
राजकारणात काही तरी काम करून विधानसभेची उमेदवारी मिळवावी, असा पायंडा पाडताना रोहित आणि धीरज यांनी मिनी मंत्रालयातून थेट विधानसभेच्या रणांगणात कूच केली आहे.
- रवींद्र देशमुख
मुंबई - विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांच्या अनेक उमेदवारांच्या नावांची घोषणा झाली आहे. 2 ऑक्टोबरच्या सुट्टीनंतर आज उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांनी एकच गर्दी केली होती. यामध्ये नवीन आणि अनुभवी उमेदवारांचा सारखाच समावेश होता. अनेक नव्या चेहऱ्यांना या निवडणुकीत संधी मिळाली आहे. त्यापैकी माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांचे चिरंजीव धीरज देशमुख आणि शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनीही अर्ज दाखल केले आहेत. या दोघांनी मिनी मंत्रालयातून अर्थात जिल्हा परिषदेतून थेट विधानसभेच्या रणांगणात उडी घेतली आहे.
आतापर्यंत सर्वच राजकीय नेत्यांचे वारसदार डायरेक्ट विधानसभा निवडणुकीतून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात करतात. राजकीय वारसा लाभलेल्या आदित्य ठाकरे, संतोष दानवे, अमित देशमुख, प्रणिती शिंदे, पंकजा मुंडे यांनी आपली राजकीय कारकिर्द विधानसभा निवडणुकीतून सुरू केली. परंतु, रोहित पवार आणि धीरज देशमुख यासाठी अपवाद ठरले.
रोहित पवार यांनी सुरुवातीला बारामती अॅग्रोच्या माध्यमातून काम केले. त्यानंतर कर्जत-जामखेड या खडतर मतदार संघाची विधानसभेसाठी निवड करून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. या मतदार संघात आतापर्यंत एकदाही राष्ट्रवादीला विजय मिळवता आला नसून जलसंधारण मंत्री राम शिदे येथून भाजपचे उमेदवार आहेत. या सर्व स्थितीत रोहित यांनी मागील दोन वर्षांपासून मतदार संघात संघटन मजबूत करण्यावर भर दिला. त्यांना राष्ट्रवादीने येथून उमेदवारी दिली असून त्यांनी आजच अर्ज सादर केला.
माजी मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव धीरज देशमुख यांच्या बाबतीतही असच काहीस झालं आहे. धीरज देशमुख यांनी जिल्हा परिषद सदस्यपदापासून सुरुवात केली. धीरज यांच्या घराला राजकीय वारसा लाभला असून मोठे बंधू अमित देशमुख आमदार आणि माजी मंत्री आहेत. अशा स्थितीत आपला वेगळा ठसा उमटविण्यासाठी धीरज यांनी जिल्हा परिषदेतून राजकारणात उतरण्याचा निर्णय घेतला. त्यांनी देखील आज काँग्रेसकडून अर्ज सादर केला.
एकंदरीत अनेक नेत्यांची मुलं राजकारणाची सुरुवात विधानसभेपासून करत असताना रोहित आणि धीरज यांनी जिल्हा परिषद सदस्यपदाने केली. किंबहुना राजकारणात काही तरी काम करून विधानसभेची उमेदवारी मिळवावी, असा पायंडा पाडताना रोहित आणि धीरज यांनी मिनी मंत्रालयातून थेट विधानसभेच्या रणांगणात कूच केली आहे.