मनोज गडनीस
Rohit Pawar ED Enquiry ( Marathi News ) : राष्ट्रवादी काँग्रेस(शरद पवार) गटाचे आमदार रोहित पवार यांची आज(दि.2) सक्तवसुली संचालनालयाच्या (ED) अधिकाऱ्यांनी सुमारे 8.30 तास चौकशी केली. दुपारी एकच्या दरम्यान ते ईडीच्या कार्यालयात दाखल झाले अन् आता रात्री 9.15 च्या सुमारास ईडीच्या कार्यालयाबाहेर आले. रोहित पवार पवार ईडी कार्यालयाबाहेर आल्यानंतर तिथे मोठ्या प्रमाणात शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती.
यावेळी रोहित पवारांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले. देशात आणि राज्यात चुकीच्या गोष्टी सुरू आहेत, लोकशाहीचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होतोय. आम्ही विचारांसाठी लढत आहोत. राज्य सरकारमध्ये सत्तेत असणाऱ्या नेत्यांना वाटत असेल की, आम्ही घाबरलो आहोत. मला त्यांना एकच सांगायचे आहे, याआधी जे घाबरले ते पळून गेले, सर्वांनी बघितलं आहे, पण आम्ही घाबरणारे नाही, अशी टीका त्यांनी केली.
तसेच, आज बजेटचा दिवस असल्यामुळे सुप्रिया सुळे लोकसभेला गेल्या आहेत. सुप्रिया ताई महाराष्ट्राचा आवाज म्हणून मुद्दे मांडत आहेत. खासदार अमोल कोल्हे देखील लोकसभेत आपली जाबाबदारी पार पाडत आहेत. आपल्या अनुभवाचा फायदा राष्ट्राला व्हावा म्हणून शरद पवार हे राज्यसभेत लोकप्रतिनिधी म्हणून जबाबदारी बजावत आहेत. नाहीतर काही लोकं फक्त नावासाठी आमदार, खासदार बनतात. पण आपले खासदार राज्यसभेत आणि लोकसभेत आपली जबाबदारी पार पाडत आहेत, असंही राहोत पवार यावेळी म्हणाले.
8 फेब्रुवारीला पुन्हा बोलावले
या चौकशीच्या संदर्भात आवश्यक ती कागदपत्रे सादर करण्यासाठी 8 फेब्रुवारी रोजी त्यांना पुन्हा ईडीच्या अधिकाऱ्यांनी बोलावले आहे. यापूर्वी २४ जानेवारी ईडीच्या अधिकाऱ्यांनी रोहित पवार यांची तब्बल 12 तास चौकशी केली होती. हे प्रकरण महाराष्ट्र राज्य सहकारी शिखर बँकेत झालेल्या कथित आर्थिक घोटाळ्याशी संबंधित आहे. या प्रकरणी 5 जानेवारी रोजी ईडीच्या अधिकाऱ्यांनी रोहित पवारांच्या बारातमी ॲग्रो कंपनीसह सहा ठिकाणी छापेमारी केली होती.