“शरद पवार, अजितदादांवर टीका म्हणजे राज्याच्या संस्कृतीला टार्गेट करण्यासारखं”: रोहित पवार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2022 04:50 PM2022-04-16T16:50:19+5:302022-04-16T16:51:24+5:30

आदित्य ठाकरेंना पाठिंबा देत, तर मीसुद्धा अयोध्येला जाईन, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.

rohit pawar replied to bjp over sharad pawar and ajit pawar criticism and navneet rana allegations | “शरद पवार, अजितदादांवर टीका म्हणजे राज्याच्या संस्कृतीला टार्गेट करण्यासारखं”: रोहित पवार

“शरद पवार, अजितदादांवर टीका म्हणजे राज्याच्या संस्कृतीला टार्गेट करण्यासारखं”: रोहित पवार

googlenewsNext

जालना: गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार आणि भाजप यांच्यातील आरोप-प्रत्यारोप वाढताना दिसत आहेत. यात आता मनसेनेही उडी घेतली असून, राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar), राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर जाहीर सभांमध्ये जोरदार निशाणा साधला. यावरून राष्ट्रवादीचे आमदार आणि युवा नेतृत्व रोहित पवार (Rohit Pawar) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ते जालन्यात बोलत होते. 

जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी कारखान्याच्या इथेनॉल प्रकल्पाच्या उद्घाटन सोहळ्याला रोहित पवार यांनी हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी राज्यातील चालू घडामोडींवर भाष्य करताना भाजपवर टीका केली आहे. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आता भाजपची भाषा बोलू लागल्या आहेत. त्यांचे पद टिकवण्यासाठी आणि पुन्हा निवडून येण्यासाठी त्यांना तिकीट हवे असेल म्हणून त्यांनी भूमिका बदलली असावी. तसेच निवडून येण्यासाठी भाजप काहीही करायला तयार आहे, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे. 

राज्याच्या संस्कृतीला टार्गेट करण्यासारखे

काही दिवसांपासून शरद पवार आणि अजित पवार यांना टार्गेट केले जात असून हे आम्हाला नाही तर राज्याच्या संस्कृतीला टार्गेट केले जात असल्याचा आरोप रोहित पवार यांनी यावेळी केला. लोकशाही मार्गाने भाजपला विजय मिळवता येत नाही. त्यामुळे सोशल मीडिया, केंद्रीय यंत्रणा हाताशी धरले जात आहे. मुंबई महापालिकेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून महाविकास आघाडीच्या नेत्यांना टार्गेट केले जात आहे, असे रोहित पवार म्हणाले.

दरम्यान, युवासेना नेते आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. यावरून विरोधकांनी टीका करणे सुरू केले असले तरी आमदार रोहित पवारांनी आदित्य ठाकरे यांना पाठिंबा दिला आहे. निमंत्रण आल्यास मी सुद्धा त्यांच्यासोबत आयोध्या दौऱ्यावर जाईन, असे रोहित पवारांनी म्हटले आहे.
 

Web Title: rohit pawar replied to bjp over sharad pawar and ajit pawar criticism and navneet rana allegations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.