आदित्य ठाकरेंपेक्षा रोहित पवार श्रीमंत, जाणून घ्या संपत्तीच विवरण
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2019 09:04 PM2019-10-03T21:04:29+5:302019-10-03T21:05:13+5:30
रोहित पवार यांनी निवडणुकीसाठी अर्ज भरतेवेळी प्रतिज्ञापत्रात आपल्या संपत्तीचा उल्लेख केला आहे
मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि कर्जत-जामखेड मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार रोहित पवार यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यावेळी आपली संपत्तीही रोहित पवार यांनी जाहीर केली आहे. त्यानुसार रोहित पवार यांच्याकडे 27 कोटी रुपयांची संपत्ती आहे. त्यामुळे संपत्तीच्या बाबतीत रोहित पवार यांनी युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरेंना मागे पाडले आहे. आदित्य ठाकरे यांची एकूण संपत्ती 16 कोटी रुपये आहे.
रोहित पवार यांनी निवडणुकीसाठी अर्ज भरतेवेळी प्रतिज्ञापत्रात आपल्या संपत्तीचा उल्लेख केला आहे. त्यानुसार, रोहित यांची एकूण संपत्ती 27 कोटी 44 लाख 29 हजार 200 रुपये एवढी आहे. तर त्यांची स्थावर चल अचल मालमत्ता 23 कोटी 99 लाख 29 हजार 200 रुपये एवढी आहे. रोहित पवार यांच्याकडे वडिलोपार्जित 3 कोटी 45 लाख रुपयांची संपत्ती आहे. रोहित पवार यांच्या बँक खात्यात 2,75,31,034 रुपये आहेत. तर त्यांनी बॉन्ड, डिबेनचर्स आणि शेयर्समध्ये 9,65,11,071 रुपयांची गुंतवणूक केली आहे. नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट, पोस्ट आणि विम्यामध्ये रोहित पवार यांचे 57,07,029 रुपये आहेत.
रोहित पवार यांच्याकडे 11,92,319 रुपयांची गाडी आहे. तर 11,21,732 रुपयांचं सोनं, 47,007 रुपयांची चांदी, 1,68,000 हजार रुपयांचे हिरे आणि 4,52,420 रुपयांचे इतर दागिने आहेत. रोहित पवार यांच्याकडे रोलेक्स, ओमेगा, टॅग ह्युअर, कार्टर, लॉगीनेस या कंपन्यांची घड्याळं आहेत. या घड्याळांची अंदाजे किंमत 27,91,928 रुपये असल्याचं रोहित पवार यांनी त्यांच्या प्रतिज्ञापत्रात सांगितलं आहे. रोहित पवार हे व्यवसायाने उद्योजक असून साखर कारखान्याचे संचालक आहेत. तसेच, जिल्हा परिषदेचे सदस्यही आहेत.