'भाजप एसीत बसून मजा पाहत आहे अणि आम्ही आमच्यातच भांडतोय', रोहित पवारांचा घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2023 11:07 AM2023-07-10T11:07:35+5:302023-07-10T11:09:27+5:30

'पक्ष फोडण्याचे खापर अजितदादांवर, त्यांना विलेन ठरवण्याचे काम सुरू आहे.'

Rohit Pawar slams bjp, says 'BJP is enjoying and we are fighting among ourselves' | 'भाजप एसीत बसून मजा पाहत आहे अणि आम्ही आमच्यातच भांडतोय', रोहित पवारांचा घणाघात

'भाजप एसीत बसून मजा पाहत आहे अणि आम्ही आमच्यातच भांडतोय', रोहित पवारांचा घणाघात

googlenewsNext

मुंबई -राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्यातील राजकीय परिस्थितीवर भाष्य केले. यावेळी त्यांनी भाजपवर पक्ष आणि कुटुंब फोडल्याचा आरोप केला. भाजपने योग्य पद्धतीने डाव खेळला आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी अस्मिता जपण्यासाटी शिवसेना पक्ष काढला आणि भाजपने तो पक्ष फोडला, अशी टीका त्यांनी यावेळी केली. यासोबतच अजित पवारांसोबत गेलेल्या बंडखोर नेत्यांनाही अनेक खोचक सवाल केले. 

अजितदादांना विलेन करण्याचे काम...
रोहित पवार म्हणाले की, आज देशभरात भाजपविरोधात वातावरण तयार होत आहे. त्याबद्दल कुणी काही बोलू नये, मोठे नेते आपापसात गुंतवून राहावेत, यासाठी भाजपने आधी उद्धव ठाकरेंचा पक्ष फोडला आणि आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडला. आम्ही आमच्यातच उत्तर-प्रत्युत्तर देत आहोत आणि तिकडे भाजप बाजुला राहत आहे. पक्ष फोडण्याचे खापर अजितदादांवर फोडले जात आहे. अजित दादांना विलेन ठरवण्याचे काम चार-पाच नेते करत आहेत. तिकडे भाजप एसीत बसून मजा पाहत आहे आणि आम्ही आमच्यातच भांडतोय, अशी टीका त्यांनी यावेळी केली. 

मग तुम्ही विकास केला नाही का?
भाजपसोबत गेलेले आज म्हणत आहे की, आम्ही विकासासाठी हा निर्णय घेतला. मग तुम्ही पदावर असताना विकास केला नाही का, असा प्रश्न सामान्यांना पडतोय. या सगळ्या घडामोडी होत होत्या, तेव्हा माझ्या आई-वडीलांनी मला प्रश्न केला की, तू वयस्कर होशी, 80च्या पुढे जाशील, तेव्हा अशीच भूमिका घेणार का? माझ्याच आई-वडिलांना हा प्रश्न पडत असेल, तर सामान्यांना पडणारच ना... 

सत्तेसाठी दोन कुटुंब फोडले
मी माझ्या पक्षासोबत, माझ्या आजोबांसोबत राहण्याची भूमिका घेतली आहे. या सर्व घडामोडींना राज्यातील जनता व्यक्तिगत घेत आहे, त्यामुळे जनता आमच्या सोबत कायम असेल. कुटुंब कुणी फोडले, पक्ष कुणी फोडला, हे सगळ्यांना माहिती आहे. सत्तेसाठी भाजपने राज्यातील दोन मोठे कुटुंब फोडले, हे लोकांना पटले नाही. एकेकाळी भाजपविरोधात बोलणारे सत्तेसाठी त्यांच्यासोबत बसले आहेत, हे लोकांना पटणारे नाही. हे लोक पवार साहेबांसोबत असे करू शकतात, तर सामान्यांचे काय, असा सवाल प्रत्येकाला पडला आहे, अशी टीकाही रोहित पवारांनी यावेळी केली.
 

Web Title: Rohit Pawar slams bjp, says 'BJP is enjoying and we are fighting among ourselves'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.