मुंबई : मुंबई विद्यापीठातील 'बाळासाहेब ठाकरे अध्यासन केंद्रा'त दोन दिवसांपूर्वी दुर्मिळ छायाचित्रांचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. या प्रदर्शनाला राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी भेट दिली होती. यानंतर रोहित पवार यांनी या प्रदर्शनातील काही फोटो ट्विट केले आहेत. विशेष म्हणजे या फोटोंमध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या अंत्ययात्रेवेळी काढण्यात आलेला एक फोटो होता. हा फोटो पाहून मी तर निःशब्दच झालो, असे रोहित पवार यांनी ट्विटद्वारे म्हटले आहे.
मुंबई विद्यापीठाचे सिनेट सदस्य प्रदिप सावंत व मुंबई न्यूज फोटोग्राफर असोसिएशनने हे प्रदर्शन भरवले होते. यामध्ये अनेक छायाचित्रकारांनी वेगवेगळ्या प्रसंगी काढलेले बाळासाहेब ठाकरे यांचे फोटो होते. तसेच, कामगार नेते जॉर्ज फर्नांडीस, माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी, प्रमोद महाजन, शरद पवार यांच्यासोबतचे बाळासाहेबांनी घालवलेले क्षण कॅमेराच्या माध्यमातून टिपण्यात आले फोटो होते. जवळपास 1 हजार फोटोंपैकी निवडक 75 फोटो या प्रदर्शनात लावले होते.
या प्रदर्शनात बाळासाहेब ठाकरे यांच्या अंत्ययात्रेतील उद्धव ठाकरे यांचा इमोशनल फोटो आहे. या फोटोजवळ उभा राहून आमदार रोहित पवार यांनी आपला फोटो काढला आहे आणि हा फोटो इतर फोटोंसह त्यांनी ट्विट केला आहे. हा फोटो पाहून नि:शब्द झाल्याच्या भावना त्यांनी ट्विटरद्वारे व्यक्त केल्या. "मुंबई विद्यापीठाच्या 'बाळासाहेब ठाकरे अध्यासन केंद्रा'त भरवलेल्या शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या दुर्मिळ छायाचित्रांच्या प्रदर्शनातील हा फोटो खूप बोलका आहे. तो पाहून मी तर निःशब्दच झालो", असे ट्विटद्वारे रोहित पवार म्हणाले.
"बाळासाहेबांना खूप आनंद झाला असता"दरम्यान, मुंबई विद्यापाठातील'बाळासाहेब ठाकरे अध्यासन केंद्रा'त भरलेल्या या प्रदर्शनाला पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, ज्येष्ठ नेते शरद पवार, मंत्री जितेंद्र आव्हाड, आमदार रोहित पवार यांनी भेट दिली. त्यावेळी बाळासाहेब ठाकरे, शरद पवार, प्रमोद महाजन यांचे एकत्रित फोटो पाहून आदित्य ठाकरे यांनी दिग्गजांच्या मैत्रीपूर्ण राजकारणाच्या आठवणी जागवल्या. तसेच आज बाळासाहेब असते तर मित्राबरोबर युती करुन सरकार स्थापन केल्याचा त्यांना खूप आनंद झाला असता, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.