"मविआत मंत्री बनवलं नव्हतं म्हणून.."; अजित पवार गटाचा रोहित पवारांबाबत मोठा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2024 04:54 PM2024-02-01T16:54:33+5:302024-02-01T16:55:27+5:30
तुम्ही भविष्यात ताकद द्या असं कोण म्हणालं होते, कोण पळायला चालले होते असा सवाल अजित पवार गटाचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी थेट विचारला आहे.
मुंबई - पळणारा दादा हा रोहित पवार आहे. रोहित पवार पहिल्यांदा राष्ट्रवादीसोडून भाजपात पळून चालले होते. ते आज काय सांगतायेत? ३५ वर्ष अजित पवारांनी राष्ट्रवादीत दिली. पक्ष वाढवण्यात जेवढे योगदान शरद पवारांचे आहे तेवढेच अजित पवारांचे आहे अशा शब्दात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी शरद पवार गटाला टोला लगावला आहे.
आमदार रोहित पवार यांची ईडीकडून चौकशी सुरू आहे. या चौकशीला सामोरे जाताना शरद पवार गटाकडून रोहित पवारांना पाठिंबा देणारे कार्यकर्ते आणि नेते मोठ्या प्रमाणात हजर राहत आहेत. त्यात अजित पवारांवर टीका केली जात आहे. त्यावर उमेश पाटील यांनी म्हटलं की, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, प्रफुल पटेल, हसन मुश्रीफ यांचेही पक्ष वाढवण्यासाठी योगदान आहे. तुम्ही आयते आले आहात. तुम्ही पवारांचे नातू नसता तर कर्जत जामखेडमध्ये तुम्ही ग्रामपंचायतीत तरी निवडून आला असता का? असा सवाल त्यांनी विचारला.
तसेच निवडून आल्यानंतर तुम्हाला महाविकास आघाडीत मंत्री बनवलं नाही म्हणून रोहित पवार यांनी एका भाजपा खासदाराच्या मदतीने दिल्लीतल्या नेत्यांकडे गेले. तिथे मी आता राष्ट्रवादी काँग्रेसचा राजीनामा देतो आणि भाजपाचं कमळ चिन्ह घेऊन लढतो. तुम्ही भविष्यात ताकद द्या असं कोण म्हणालं होते, कोण पळायला चालले होते. आजोबांची काळजी त्यावेळी नव्हती, कुटुंबाची काळजी नव्हती, त्यावेळी महाराष्ट्र धर्म नव्हता? तुमचा धर्म त्याचवेळी भ्रष्ट झालेला आहे असा दावा उमेश पाटील यांनी करत रोहित पवारांवर आरोप केले.
दरम्यान, तुम्हाला अजित पवारांची जागा घेण्याची घाई झालेली आहे. रोहित पवार हे साहेबांचे नातू, कुटुंबातील सदस्यांबाबतीत अशाप्रकारे चौकशीला सामोरे जावं लागतंय म्हणून आपुलकीने धीर देण्यासाठी उपस्थित राहणे गैर नाही. शरद पवारांच्या कार्यकर्त्यांबद्दल, कुटुंबाबद्दलची भावना असेल त्यावर भाष्य करायचं नाही असंही उमेश पाटील यांनी स्पष्ट केले.
काय आहे प्रकरण?
आमदार रोहित पवार यांच्यामागे गेल्या काही दिवसांपासून ईडीच्या चौकशीचा ससेमिरा लागला आहे. रोहित पवार यांची बुधवारी ईडीच्या अधिकाऱ्यांनी तब्बल १२ तास चौकशी केली. त्यानंतर आज पुन्हा एकदा ते चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर झाले आहेत. कुटुंबातील तरुणाला केंद्रीय तपास यंत्रणांच्या चौकशीचा सामना करावा लागत असल्याने पवार कुटुंबातील सर्व सदस्य रोहित पवार यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचं पाहायला मिळत आहे. मागच्या आठवड्यात झालेल्या चौकशीवेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे स्वत: पक्षाच्या कार्यालयात दिवसभर बसून होते, तर आजच्या चौकशीवेळी रोहित पवार यांना बळ देण्यासाठी त्यांच्या आजी प्रतिभा पवार या दिवसभर राष्ट्रवादीच्या कार्यालयात बसून राहणार असल्याची माहिती आहे.