राज्याला हादरवून सोडणारा खुलासा येत्या दोन दिवसांत करणार - रोहित पवार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2024 03:45 PM2024-06-24T15:45:12+5:302024-06-24T15:46:30+5:30
गेली दोन-अडीच वर्षे सत्ताधाऱ्यांनी कमिशनखोरी करण्याव्यतिरिक्त कुठेही दिवे लावलेले नाहीत, त्यामुळे जनतेत सत्ताधाऱ्यांविरोधात प्रचंड रोष आहे आणि हा रोष लोकसभेलाही दिसून आला तसाच विधानसभेतही दिसणार आहे, असा दावा रोहित पवार यांनी केला आहे.
मुंबई : लोकसभा निवडणुकीनंतर लवकरच विधानसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत. यासाठी महायुतीसह महाविकास आघाडी तयारीला लागली आहे. मविआ नेते सध्या वेगवेगळ्या मुद्यावरून महायुती सरकारला घेरण्याचा प्रयत्न करत आहे. दरम्यान, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राज्याचे अर्थमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख अजित पवार यांनी मतदारांना आवाहन करताना पाहिजे तेवढा निधी देतो, पण ईव्हीएमचे बटण कचाकच दाबा, असे आवाहन केले होते. मात्र प्रत्यक्षात सरकारकडे निधीचीच कमतरता असल्याचे समोर आले आहे.
यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाचे पत्र शेअर करत सत्ताधारी महायुतीवर निशाणा साधला आहे. तसेच, याबाबत येत्या दोन दिवसांत मोठा खुलासा करणार, असेही रोहित पवार यांनी म्हटले आहे. यासंदर्भात रोहित पवार यांनी ट्विट केले आहे. गेली दोन-अडीच वर्षे सत्ताधाऱ्यांनी कमिशनखोरी करण्याव्यतिरिक्त कुठेही दिवे लावलेले नाहीत, त्यामुळे जनतेत सत्ताधाऱ्यांविरोधात प्रचंड रोष आहे आणि हा रोष लोकसभेलाही दिसून आला तसाच विधानसभेतही दिसणार आहे, असा दावा रोहित पवार यांनी केला आहे.
आता निवडणुका जवळ येत असल्याने आम्ही काहीतरी केले हे कसे दाखवावे, या विवंचनेतून सत्ताधारी आमदारांना येणाऱ्या अधिवेशनात भरीव निधी देण्याच्या हालचाली सुरू आहेत. पण निधी देणार कुठून? हा प्रश्न अर्थमंत्र्यांना आणि अर्थमंत्र्यांची फाइल ज्यांच्या सहीने मंजूर होते, त्या गृहमंत्र्यांना पडतो की नाही? असा सवाल करत सरकारच्या याच उधळपट्टीमुळे राज्याच्या तिजोरीत निधीचा खडखडाट झाला असून यंदा सार्वजनिक बांधकाम विभागाची 20 हजार कोटींची बिले अद्यापही थकीत आहेत, असे रोहित पवार म्हणाले.
गेली दोन अडीच वर्षे सत्ताधाऱ्यांनी कमिशनखोरी करण्याव्यतिरिक्त कुठेही दिवे लावलेले नाहीत, त्यामुळे जनतेत सत्ताधाऱ्यांविरोधात प्रचंड रोष आहे आणि हा रोष लोकसभेलाही दिसून आला.. तसाच विधानसभेतही दिसणार आहे.
— Rohit Pawar (@RRPSpeaks) June 24, 2024
आता निवडणुका जवळ येत असल्याने आम्ही काहीतरी केले, हे कसे दाखवावे या… pic.twitter.com/S49WQVw9h4
सरकार बिले देत नसल्याने तर राज्यातली बहुतांश कामेही थांबली आहे, अशी स्थिती असताना आणखी कमिशन खाण्यासाठी आणि पदाधिकाऱ्यांना, आमदारांना खूष करण्यासाठी नवीन कामांना निधी देण्याचा घाट घातला जात आहे का? यासाठी पुन्हा नव्याने हजारो कोटी रुपयांची कर्जे काढली जातील. हे सरकार पुन्हा सत्तेत तर येणार नाही, मात्र जाता जाता राज्याच्या तिजोरीची पूर्णपणे वाट लावून जाईल, हे मात्र नक्की आहे. यासंदर्भात राज्याची तिजोरी कुरतडणारा. राज्याला हादरवून सोडणारा मोठा खुलासा येत्या दोन दिवसात करणार असल्याचा इशारा सुद्धा रोहित पवार यांनी दिला आहे.