रोहित पवारांचं आंदोलन, अजितदादांनी फटकारलं; उदय सामंतांच्या मध्यस्थीने निघाला तोडगा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2023 01:09 PM2023-07-24T13:09:12+5:302023-07-24T13:10:26+5:30
रोहित पवारांच्या आंदोलनस्थळी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी येत याप्रश्नी तोडगा काढला
मुंबई – पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यात राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी त्यांच्या कर्जत जामखेड मतदारसंघातील एमआयडीसीच्या प्रश्नावर आंदोलन केले. विधान भवन परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ बॅनर घेऊन रोहित पवार बसले. आश्वासन देऊनही सरकार प्रश्न मार्गी लावत नाही. दबावाच्या राजकारणाला सरकार बळी पडलंय. त्यामुळे उपोषण करण्याचा निर्धार रोहित पवारांनी केला. त्यावर सभागृहात अजित पवार यांनी रोहित पवारांना फटकारले.
सभागृहात अजित पवार म्हणाले की, १ जुलै २०२३ रोजी आमदार रोहित पवार यांनी २२ जूनला दिलेले पत्र मिळाले. कर्जत जामखेडमध्ये MIDC बाबत होते. त्यावर विभागाने येत्या पावसाळी अधिवेशनात सर्व संबंधितांसोबत बैठकीचे आयोजन करून उचित निर्णय घेण्यात येईल. त्यामुळे उपोषण आंदोलन मागे घेण्यात यावे असं कळवले होते. मंत्री महोदयांनी पत्र दिले, अधिवेशन संपले नाही. आता दुसरा आठवडा सुरू झालाय. लोकप्रतिनिधींनी मंत्र्यांनी आणि विभागाच्या अधिकाऱ्यांनी पत्र दिल्यानंतर त्याची गंभीर दखल घ्यायला हवी अशारितीने आंदोलनाला बसणे उचित नाही अशा शब्दात अजित पवारांनी रोहित पवारांना फटकारले.
त्यावर रोहित पवार यांनी प्रत्युत्तर देत अजितदादा धडाडीने निर्णय घेणारे नेते म्हणून आपली ओळख आहे. MIDC चा विषय हा आजचा नाही तर केवळ अधिसूचना काढून पुढील कायदेशीर बाबी पूर्ण करण्यासाठी गेल्या वर्षभरापासून मी वारंवार मुख्यमंत्री, उद्योगमंत्री यांना भेटून विनंती केली, निवेदनं दिली, विधानसभेतही आवाज उठवला. परंतु राजकीय दबावाला बळी पडत सरकारने प्रत्येक वेळी माझी आश्वासनावर बोळवण केली. त्यामुळं नाईलाजाने उपोषणाला बसण्याचा निर्णय घ्यावा लागला. उपमुख्यमंत्री म्हणून आपणच याकामी लक्ष घालून हा प्रश्न मार्गी लावला तर माझा संपूर्ण मतदारसंघ आपला कायमस्वरूपी आभारी राहील अशी मागणी केली आहे.
दरम्यान, रोहित पवारांच्या आंदोलनस्थळी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी येत याप्रश्नी तोडगा काढला. मंत्री उदय सामंत यांनी म्हटलं की, MIDC साठी तातडीने अधिसूचना काढण्यासाठी सरकार सकारात्मक पाऊले उचलेल. रोहित पवार यांनी जे आंदोलन केले ते त्यांच्या मतदारसंघातील एमआयडीसीसाठी होते. या विभागाचा मंत्री म्हणून मी त्यांच्याशी चर्चा केली. या प्रश्नाबाबत उद्या तातडीची बैठक घेतली जाईल असं आश्वासन मंत्री उदय सामंत यांनी दिले. तर गेले वर्षभर मी प्रश्नासाठी निवेदन देत आहे. मागच्या अधिवेशनातही आश्वासन देण्यात आले होते. माझ्या मतदारसंघातील युवकांच्या हक्कांसाठी मी लढत होतो. तिथे दोन्ही गटाचे नेते आले. मंत्री उदय सामंत यांनी शब्द देत अधिसूचनेबाबत बैठक घेऊन अधिवेशन संपण्याच्या आत अधिसूचना काढू असा शब्द मंत्र्यांनी दिला आहे. त्यामुळे त्यांच्यावर विश्वास ठेवून मी आंदोलन मागे घेतले आहे असं आमदार रोहित पवार यांनी म्हटलं.