मुंबई - Rohit Pawar on Ajit Pawar ( Marathi News ) श्रीनिवास पवारांनी घेतलेली भूमिका सामान्य माणसांना पटणारी आहे. ते स्वत: अजितदादांचे सख्खे बंधू आहेत, दादांना जवळून त्यांनी बघितलं आहे. तसं साहेबांनाही जवळून पाहिले आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टीकडे बघताना पवार कुटुंबीय म्हणून त्यांनी घेतलेली भूमिका हा सामान्यांना पटणारी आहे. म्हणून आज ते शरद पवार आणि सुप्रिया सुळेंसोबत आहेत असं विधान आमदार रोहित पवारांनी केले आहे.
आमदार रोहित पवार म्हणाले की, पवार कुटुंबाची ओळख शरद पवार आहेत. कुटुंबाची संस्कृती श्रीनिवास काकांनी बोलून दाखवली. अजित पवारांनी घेतलेला निर्णय आम्हाला कुटुंब म्हणून वाईट वाटले. श्रीनिवास काकांनी घेतलेली भूमिका ही पवार कुटुंबाची आहे. ती संस्कृती आहे. सर्वसामान्य जनतेची तीच भूमिका आहे. कुटुंब म्हणून आम्ही सर्वजण एक आहोत. विचारांना पक्के आहोत, भूमिकेला पक्के आहेत. अजितदादा आणि त्यांच्या कुटुंबाने वेगळी भूमिका घेतली. त्या चौघांची भूमिका वेगळी पण पवार कुटुंबात १०० हून अधिक लोक आहेत असं त्यांनी सांगितले.
तसेच पवार कुटुंबाने अजितदादांना एकटे पाडले नाही तर त्यांनी जो निर्णय घेतला त्यामुळे ते एकटे पडलेत. जे आजपर्यंत सामाजिक काम सर्वांनी मिळून केले आहे. त्यामुळे सर्वजण आज प्रचारात गुंतलेले आहेत. भारतीय संस्कृतीत कुटुंब सर्वाधिक महत्त्वाचे असते. भाजपाने पवार कुटुंब फोडले, स्वहितासाठी संस्कृतीला तडा देण्याचा प्रयत्न केला. पक्ष फोडताना कुटुंबही फोडले. कुटुंब आणि पक्ष फोडणे हे लोकांना पटत नव्हते. त्यामागे कर्ताधनी कोण हे देवेंद्र फडणवीसांनी बोलून दाखवले. त्यामुळे लोक आता भाजपाच्याविरोधात आहे असं रोहित पवारांनी सांगितले.
दरम्यान, लोकशाहीच्या माध्यमातून महाराष्ट्रातून भाजपाला तडीपार केल्यानंतरच हे सगळे थांबेल. सर्वसामान्यांचे विषय घेतले जात नाही. पक्ष फोडण्यावर बोलले जाते. लोकांना या गोष्टीचा तिरस्कार येतोय. शरद पवारांनी पक्ष फोडले नाही. धनंजय मुंडे यांना समजावून देखील ते पक्ष सोडणार होते. तेव्हा ते आमच्यासोबत आले. आज प्रमुख पक्षाचे नेते, कार्यकर्ते भाजपाविरोधात लढत आहेत असंही रोहित पवारांनी म्हटलं.