इस्लामपूर - जगभरात सगळीकडे व्हेलन्टाईन डेचा उत्साह सुरु आहेत. त्याच तरुणाई मोठ्या आतुरतेने व्हेलन्टाईन डेची आतुरतेने वाट पाहत असतात. यात युवा राजकारणी मागे कसे असतील. आमदार रोहित पवार यांनी एका कॉलेज कार्यक्रमात विद्यार्थ्यांसमोर प्रेमाची कबुली दिली आहे.
याबाबत बोलताना रोहित पवार म्हणाले की, मुंबई शिक्षणाला होतो, कष्टावर प्रेम होतं, जीमवर प्रेम होतं. तीन वर्ष मनापासून जीम केली. कॉलेजमध्ये तुम्हाला प्रेम होतं तसं मला कधी झालं नाही, व्हेलन्टाईन डे येतो, आयुष्यात एकदाच प्रेम केलं ज्याचा तुम्ही विचार करताय, ते माझ्या बायकोवर झालं. ते शेवटपर्यंत राहणार आहे असं त्यांनी सांगितले. तसेच व्हेलन्टाईन डे येतोय हे मला व्हॉट्सअपवर कळालं, कॉलेजचं जीवन भारी होतं. प्रेमाच्या गोष्टी बोलायला लागल्यावर शिट्ट्या वाजतात. घरुन २ हजार रुपये महिन्याला यायचे, त्यातून महिनाभर काढायचा, पण कमी पडले तर मित्र सोबतीला असायचे असं ते म्हणाले.
त्याचसोबत तिसरीपर्यंत माझं शिक्षण बारामतीत झालं. त्यानंतर वालचंद येथे शाळेत शिकायला गेलो, मी ज्या कॉलेजमध्ये शिकायला गेलो ते मुलांचे कॉलेज होते. त्यानंतर मुंबईत एच आर कॉलेजमध्ये १३ वी पासून पुढचं शिक्षण घेतलं. अकरावीपर्यंत मी फार लाजायचो, कोणी पाहुणे आलं तर मी घराच्या आतमध्ये असायचो, मला खेळायला आवडायचं, मासे पकडायला आवडायचे. दहावीत अभ्यास केला पण किती टक्के पडले हे मी सांगत नाही. कारण मी अभ्यासात हुशार नसायचो. तरीही अभ्यास करुन ७७ टक्के मार्क पडले. पवारसाहेबांचा वापर केला नाही आवर्जुन सांगतो असं सांगत रोहित पवारांनी उपस्थितांमध्ये हशा पिकवला.
दरम्यान, कॉलेजमध्ये बाईक घेऊन फिरायचो पण एकटाच होतो मागे कोणी नव्हतं. वर्गात मागे बसायचो, ज्या ठिकाणी रिक्षा चालते त्याला उपनगर म्हणतात, टॅक्सी चालते त्याला मुंबई शहर बोलतात, मला विचारायचे तु कुठला मग मी बारामतीचा सांगायचो, मग मला बोलायचे हा घाटावरचा घाटी आहे. मग मी एकदा १२० लोकांना बसमधून बारामतीत घेऊन गेलो, तिथे त्यांचा आदर सत्कार झाला, त्यानंतर मला कोणी घाटी म्हणून बोलायचे बंद झाले असा किस्साही रोहित पवारांनी सांगितला.