बेळगाव - गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील सीमाप्रश्न पेटला आहे. त्यातच कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केलेल्या प्रक्षोभक विधानांनी आगीत तेल ओतण्याचे काम केले आहे. बेळगावमध्ये येणाऱ्या महाराष्ट्राच्या नेत्यांना बोम्मई यांनी इशारा दिला होता. दरम्यान, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेली धमकी धुडकावून लावत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार हे बेळगावमध्ये दाखल झाले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार हे आज बेळगावमध्ये दाखल झाले आहेत. बेळगावमध्ये दाखल झाल्यानंतर रोहित पवार यांनी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले आहे. सीमावादावरून वातावरण तापलेले असताना आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री धमक्या देत असल्याच्या पार्श्वभूमीवर रोहित पवार हे बेळगावात दाखल झाल्याने या दौऱ्याला महत्त्व प्राप्त झाले आहे. या दौऱ्यात रोहित पवार यांनी हिंडलगा येथील हुतात्मा स्मारकास भेट देऊन कन्नड सक्ती विरोधातील आंदोलनात हौतात्म्य पत्करलेल्या हुतात्म्यांना अभिवादन केले.या ठिकाणी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या ज्येष्ठ नेत्यांशी त्यांनी चर्चा केली. यावेळी हा आपल्या अस्मितेचा लढा असल्याची भावना सर्वांनी बोलून दाखवली आणि त्या भावनेशी मी सहमत आहे,असे रोहित परावर यांनी सांगितले.
दरम्यान, सीमावाद पेटल्यानंतर कर्नाटकमध्ये महाराष्ट्राच्या वाहनांची तोडफोड झाल्यानंतर राज्यात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत कर्नाटकला इशारा दिला होता. संविधानाने सर्वांना अधिकार दिलेत आहेत, कर्नाटक सरकारकडून सातत्यानं वेगवेगळ्या गोष्टी करण्यात येत आहेत. सातत्यानं वेगवेगळी वक्तव्ये येतं आहेत. हे अतिशय चिंताजनक आहे. त्यामुळे सीमाप्रश्नी आता भूमिका घेण्याची वेळ आली आहे. हे प्रकरण येत्या ४८ तासांत संपलं नाही, तर मला बेळगावात जावं लागेल. तेथिल स्थानिकांना धीर द्यावा लागेल, असं शरद पवार म्हणाले होते. शरद पवार यांच्या या विधानानंतर रोहित पवार यांनीही आपली भूमिका स्पष्ट केली होती. महाराष्ट्राच्या सरकारने योग्य भूमिका घेतली नाही, तर पवारसाहेब जे बोललेत ते करतील. शरद पवार जेव्हा ते करतील तेव्हा अख्खा महाराष्ट्रात कर्नाटकात दिसेल, असे आमदार रोहित पवार यांनी म्हटलं होतं.