- सत्तार शेख
हळगाव (अहमदनगर) : रोहित पवार यांच्या विजयासाठी गेल्या महिनाभरापासून हळगाव येथील विमल मंडलिक यांनी उपवास धरला होता. विजयानंतर रोहित पवार यांनी मंडलिक यांची भेट घेत स्वतःच्या हाताने त्यांना घास भरवत मंडलिक यांचा उपवास सोडविला. रोहित पवारांच्या विजयासाठी महिनाभर उपवास करणाऱ्या माऊलीच्या रोहित भेटीचा हा क्षण अतिशय भावनिक ठरला.
गुरुवारी विजयाचा गुलाल घेतल्यानंतर सायंकाळी सहाच्या सुमारास रोहित पवार यांनी राम शिंदे यांची चौंडी येथे जाऊन भेट घेतली. त्यानंतर सायंकाळी साडेसहाच्या सुमारास रोहित पवार हळगाव येथे पोहोचले. कार्यकर्त्यांनी पवार यांचे जल्लोषात स्वागत केले. पवार यांनी मतदारांचे आभार मानले. कार्यकर्त्यांनी ढोल-ताशांच्या गजरात व फटाक्यांची आतषबाजी करीत त्यांचे जंगी स्वागत केले. हळगाव येथील दलित वस्तीलाही यावेळी पवार यांनी भेट दिली. नागरिकांशी संवाद साधला. पवार यांनी दलित वस्तीला भेट दिल्यानंतर तेथे महिलांनी औक्षण करत पवार यांचे स्वागत केले.
माजी ग्रामपंचायत सदस्या विमल मंडलिक यांनी रोहित पवार यांच्या विजयासाठी गेल्या महिनाभरापासून उपवास धरला होता. तसेच भाऊसाहेब ढवळे या कार्यकर्त्यांनेही रोहित पवार विजयी होईपर्यंत पायात चप्पल न घालण्याचा पण केला होता. ढवळे हे गेल्या महिन्याभरापासून अनवाणी पायांनी चालत होते. याची माहिती मिळताच पवार यांनी मंडलिक व ढवळे यांची आवर्जून भेट घेतली. रोहित पवार यांनी स्वत:च्या हाताने मंडलिक यांना घास भरवत उपवास सोडविला. तर, मंडलिक यांनीही स्वत:च्या मुलाप्रमाणे रोहित पवारांना भाकरी भरवली. हे दृश्य पाहून वातावरणही भावूक झाले होते.
यावेळी रोहित पवारांच्या आई सुनंदाताई पवार, बारामती अॅग्रीचे उपाध्यक्ष सुभाष गुळवे, राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते लतिफभाई शेख, वस्ताद राजूभैय्या सय्यद, उपसरपंच अशोक रंधवे, मदन लेकुरवाळे, शिवाजी ढवळे, बाबा महाराज ढवळे, रघुनाथ रंधवे, बंडू शिंदे,अन्सार शेख, शरद ढवळे सह आदी उपस्थित होते
पाहा व्हिडीओ -