ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 24 - राज ठाकरे आणि करण जोहरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ब्रोकरची भूमिका बजावली आहे, अशी टीका काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांनी केली आहे. "नेहमीच कायदा तोडणारा आणि धमक्या देणा-या राज ठाकरे यांना मुख्यमंत्र्यांनी अटक करायचे सोडून वर्षा बंगल्यावर बैठकीला बोलावले. ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे. मुख्यमंत्री यांनी राज ठाकरे यांच्यावर कायदेशीर कारवाई करायला हवी होती, परंतु शनिवारी मुख्यमंत्री, राज ठाकरे आणि फिल्म निर्मात्यांची जी बैठक झाली त्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी सेटलमेंट केली आहे. देशभक्तीची किंमत ठरविणारे राज ठाकरे आणि मुख्यमंत्री कोण ?" असा सवाल मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला.ते म्हणाले, "देशातील अशी ही पहिलीच घटना असेल की, राजकारणामध्ये भारतीय सेनेला ओढले आहे. आर्मी फंड देण्याच्या भूमिकेत मुख्यमंत्र्यांनी सहभाग घेणे ही लाजिरवाणी बाब आहे. आर्मी फंडाला ५ कोटी रुपये देण्याचा हक्क यांना दिला कोणी ? या बैठकीनंतर लगेचच आपल्या भारतीय सेनेने जाहीर केले की, आम्हाला या पैशांची गरज नाही. भारतीय सेनेने फंड नाकारत मुख्यमंत्री आणि राज ठाकरे यांना चपराक लगावली. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी जनतेची सेनेची माफी मागावी. मुख्यमंत्र्यांनी ब्रोकरची भूमिका निभावली आहे." संजय निरुपम यांनी अशी मागणी केली की, शनिवारी मुख्यमंत्री, राज ठाकरे आणि फिल्म निर्मात्यांची जी बैठक झाली त्याचे सर्व मुद्दे जनतेसमोर ठेवावेत. या बैठकीत काय चर्चा झाली हे सगळ्यांना कळाले पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी बैठकीत काय निर्णय झाला याचा सविस्तर खुलासा करावा. येत्या दोन-तीन दिवसांत जर हे जाहीर केले नाही, तर आम्ही या प्रकरणी न्यायालयात जाणार आहोत.संजय निरुपम म्हणाले की, काँग्रेसचे जेव्हा सरकार होते तेव्हा "माय नेम इज खान" या चित्रपटाला शिवसेनेने विरोध केला होता. तेव्हा आमच्या सरकारने सर्व सिनेमागृहांना संरक्षण देऊन सिनेमा रिलीज केला होता. आम्ही शिवसेनेचा विरोध मोडून काढला होता. पण भाजपा सरकारमध्ये ही हिंमत नाही. मुख्यमंत्री मनसेसोबत तह करत बसले. ब्रोकरची भूमिका निभावली. याचा मी निषेध करतो. हे अत्यंत निंदनीय आहे. या पत्रकार परिषदेला निवृत्त कमांडर राज सैनी उपस्थित होते. "आर्मीला किंवा नेव्हीला अशा पैशांची गरज नाही आहे. राजकारणामध्ये आर्मी आणि नेव्हीला सहभागी करू नये. आम्हाला सरकारकडून जे मिळते त्यात आम्ही खूश आहोत. आम्हाला अशा देणग्यांची गरज नाही आहे. राजकारणामध्ये आम्हाला ओढू नका", असंही ते म्हणाले आहेत.