लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : कोल्हापूरकरांच्या ‘पुजारी हटाओ’ मागणीबाबत अक्षम्य गुन्हा केलेल्या अजित ठाणेकरला पुरविलेल्या सुरक्षेतूनच ते पुजाऱ्यांच्या बाजूने असल्याचे सिद्ध होते. देवस्थान जमिनीबाबत करण्यात आलेला स्वतंत्र कायदा म्हणजे ‘पुजारी हटाओ’च्या मूळ मागणीला बगल देण्याचा प्रकार आहे, असा आरोप धर्मतत्त्वज्ञानाचे अभ्यासक डॉ. सुभाष देसाई यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केला. देसाई म्हणाले, पुजाऱ्यांनी माझ्यासह आंदोलनातील पुरोगामी कार्यकर्त्यांना जीवे मागण्याची धमकी दिली त्याची सखोल चौकशी करून अटक करण्याऐवजी पालकमंत्र्यांनी गुन्हा केलेल्या अजित ठाणेकरच्या सुरक्षेसाठी दोन पोलीस कर्मचारी नेमले आहेत. भाजपचे सरकार आल्यानंतर सनातन्यांनी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीमधील गैरव्यवहाराचे कारण सांगून समिती बरखास्त करण्याची मागणी केली. त्यावर त्वरित कार्यवाही करत चौकशी लावण्यात आली. पुजारी बाबूराव ठाणेकर यांनी जाहीर बैठकीत अंबाबाई मूर्ती संवर्धन प्रक्रियेशी आमचा त्याच्याशी काही संबंध नव्हता, असे सांगत देवस्थान समिती व पुरातत्त्वला दोषी ठरविले. सरकारवर एवढे आरोप होत असतानाही पालकमंत्र्यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली नाही. यावरून पाणी मुरतंय हे स्पष्ट झाले आहे.
पालकमंत्री पाटील यांची भूमिका बोटचेपी
By admin | Published: July 16, 2017 12:49 AM