’मसान’, ‘अँग्री इंडियन गॉडेसेस’, ‘मंटो’, ‘एस. दुर्गा’ किंवा‘सिक्रेड गेम्स’ म्हटलं की डोळ्यासमोर येतं ते नाव म्हणजे राजश्री देशपांडे. या कलाकृतींमधून ती लोकांच्या लक्षात राहिली तरी केवळ तेवढीच तिची ओळख नाही. या संवेदनशील अभिनेत्रीने सामाजिक क्षेत्रातही स्वत:चा वेगळा ठसा उमटविला आहे.महाराष्ट्राच्या दुष्काळी भागातील ‘पंढरी पिंपळगाव’ हे गाव तिनं दत्तक घेतलं असून, या गावात रेनवॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प तिनं सुरू केला आहे. जवळच्या दुष्काळी गावांमध्येही तिनं हे काम हाती घेतलं आहे. येत्या २३ जुलै रोजी लोकमत च्या ‘वुमन समीट’ सोहळ्यात ही प्रतिभावंत अभिनेत्री सहभागी होणार आहे. त्यानिमित्त तिच्याशी साधलेला हा संवाद.
- नम्रता फडणीस- *तुझा कला क्षेत्रातील प्रवास आम्ही पाहतच आहोत; पण सुरूवात कशी झाली ? - मी मूळची औरंगाबादची. लहानपणापासूनच माझा रंगभूमीकडे ओढा होता; पण आधी शिक्षण पूर्ण करा,अशी एक मध्यमवर्गीय कुटुंबाची मानसिकता असते. त्यामुळं शिक्षण घेता घेता मी जाहिरातींमध्ये काम करीत होते. पुण्याच्या सिंम्बायोसिस अभिमत विद्यापीठातून कायद्याचे शिक्षण घेतले; पण माझा कल अभिनयाकडेच अधिक असल्याने कलेलाच पूर्णवेळ द्यायचे ठरविले.कलाप्रवास काहीसा उशिरा सुरू झाला तरी मी कामाबाबत पूर्णत: समाधानी आहे.*चित्रपट क्षेत्रात पदार्पण करताना काही दृष्टिकोन होता का?- कलाकाराला कोणतीही सीमारेषा नसते. ती तो आखूच शकत नाही. त्याला कधी काय करायला मिळेल, कुठल्या पद्धतीच्या भूमिका मिळतील ते हातात नसते.दिग्दर्शक आणि लेखकांकडून एखादे पात्र उभे केले जाते, आपल्या घरात समोर दिसणारं पात्र आहे; पण प्रत्यक्षात ते साकार कोण करणार? माझी एक कलाकार म्हणून ते साकारणं ही जबाबदारी आहे. काल्पनिक पात्रांपेक्षा वास्तववादी भूमिका करायला मला जास्त आवडतात.*मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेली महाराष्ट्रीयन मुलगी वेगळ्या धाटणीच्या भूमिका स्वीकारते, तेव्हा समाजाचे दडपण जाणवते का?- मध्यमवर्गीय कुटुंबातील पालक जिथं शिक्षणावर अधिक लक्ष्य केंद्रित करायला सांगतात तिथं अशा घरातील एक मुलगी चित्रपटाची कोणतीही पार्श्वभूमीनसतानाही स्वत:ला सिद्ध करते. ही इतरांना वेगळी गोष्ट वाटत असली तरी मला कधी दडपण वगैरे जाणवल नाही. कुटुंबाचा माझ्यावर विश्वास आहे. समाजाचा मुलींकडे बघण्याचा दृष्टिकोन काहीसा बदलला आहे. *‘सिक्रेड गेम्स’ वेबसीरिजमधील तुझ्या भूमिकेमुळे अनेकांनाधक्का बसला? ही भूमिका स्वीकारण्यामागील विचार काय होता?- मी भूमिका स्वीकारताना चांगलं लेखन पाहाते. माझी भूमिका काय आहे? तिची पार्श्वभूमी काय? कोण आहे ती? वगैरे. माझ्यासाठी लेखन खूप महत्वाचे आहे. ‘सिक्रेड गेम्स’ मधल्या सुभद्राचा प्रवास काय आहे, या दृष्टिकोनातून मीत्या भूमिकेकडे पाहिले. भूमिका भलेही दोन किंवा तीन मिनिटांची असो; पणतिला स्वत:चा आवाज असावा. तिला एक मत असावं. तर भूमिका करायला मजायेते. ‘सावित्रीबाई फुले’ यांची भूमिका स्वीकारतानाही त्या व्यक्तिरेखेलान्याय दिला पाहिजे, असे मला वाटले. भूमिका दिसणं आणि सुंदर दिसणं यात फरकआहे. माझ्यासाठी भूमिका दिसणं महत्वाचं आहे. मला लोक त्या भूमिकेत ओळखू शकले नसतील तर मी ते पात्र वठविण्यात नक्कीच यशस्वी ठरले.* ‘एस दुर्गा’ चित्रपटावरून तुझ्यावर खूप टीका झाली? तू आवाजही उठवला होतास?_- हो, टीका तर होतच असते. हा चित्रपट न बघताच लोकांनी बोलायला सुरूवात केली. या चित्रपटापेक्षाही कितीतरी चित्रपट, मालिका हानिकारक आहेत. मात्र त्याबददल कुणीच काही बोलत नाही. ‘एस दुर्गा’ ला अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले. विविध आंतरराष्ट्रीय महोत्सवात हाचित्रपट कौतुकास पात्र ठरला; पण विचार कोण करतं ? मुलगी रात्री बारा वाजता घरी येते म्हणजे ती तिचं चारित्र्य चांगलं नसणारचं असे ठरवूनच सगळे मोकळे होतात. या मानसिकतेचे काय करायचे? माझ्या हातात समाजाला काही सांगण एवढचं आहे.*बोल्ड भूमिका किंवा स्वत:च मत मनमोकळेपणाने व्यक्त करणा-याअभिनेत्रींना सातत्याने सोशल मीडियावर ट्रोल केले जाते, हे पाहून चीड येते ? - अभिनेत्री काय किंवा समाजातील कोणत्याही महिलेने एखाद्या विषयावर आपल ंमत प्रदर्शन केलं की लगेच तिच्याकडे वेगळ्या पद्धतीने पाहिले जाते. ही समाजाची अडचण आहे. समाजाला शिक्षित करायची गरज आहे. त्यांना काय चांगलं किंवा काय वाईट हे सांगायला हवं. तिला न ओळखताच तिच्याचारित्र्यावर शिंतोडे उडवायचे या गोष्टी अगदी रामायणापासून चालत आलेल्या आहेत. त्यात अजूनही बदल झालेला नाही. यामुळे कितीतरी महिलांचे नैतिकअध:पतन झाले आहे; पण काही जणी ठामही राहिल्या आहेत.*मग तू या गोष्टीं कशा पद्धतीने हाताळतेस?-माझ्यासारख्या ज्या काही जणी बोल्ड पावलं उचलत आहेत, त्या अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करतात. मला माहिती आहे की मी काहीही वेगळं करत नाहीये. तर हा एकस्क्रिप्टचाच भाग आहे, म्हणून मी ते करीत आहे. माझे सामाजिक कार्य म्हणून एकीकडे लोक माझ कौतुकही करतात आणि दुसरीकडे अरे पण तुम्ही अशी भूमिका केली आहे असे म्हणतात. झाडावर चढणं खूप सोपं आहे पण जमिनीवर राहून काम करणं अवघड आहे. माझं काम बोलतयं हेच माझ्यासाठी पुरेसं आहे. मी खूप विचारकरून काम करते. मी कोणतही चुकीचं काम करीत नाही. हे मला माहिती आहे,त्यामुळे त्याकडे फारसे लक्ष देत नाही.